Breaking
क्रिडा व मनोरंजन

आजोबा-नातवाच्या नात्याची अनोखी गोष्ट उलगडणार ‘आदि अनंत’! 

0 5 2 0 8 0

 आजोबा-नातवाच्या नात्याची अनोखी गोष्ट उलगडणार ‘आदि अनंत’! 

अशोक सराफ – संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

कधी हट्ट, कधी मिश्किल संवाद, कधी एकमेकांना दिलेली साथ, तर कधी मनाला भिडणारे क्षण… अशा अनेक रंगांनी सजलेल्या आजोबा-नातवाच्या नात्याची गोष्ट घेऊन पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलर लाँच सोहळ्याची खासियत म्हणजे या ट्रेलरचे अनावरण ‘आदि अनंत’ टीमच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले.

अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एका आगळ्यावेगळ्या कौटुंबिक गोष्टीची झलक पाहायला मिळते. नात्यातील गंमतीजंमती, भावनिक चढ-उतार आणि नात्यांना नवी दिशा देणारे प्रसंग यांची सांगड घालणारा हा ट्रेलर चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवतो.

प्रत्येक घरात आजी-आजोबांच्या काही खास सवयी असतात, नातवंडांचे हट्ट असतात आणि त्यातून तयार होतात अनेक अविस्मरणीय किस्से. ‘आदि अनंत’मधील आजोबा आणि नातवाचे नातेही अशाच वेगळ्या रंगांनी खुलताना दिसते. दोन पिढ्यांमधील विचारांची गंमत, एकमेकांशी जुळवून घेण्याची धडपड आणि नात्यात दडलेली ओढ यांतून या चित्रपटाची कथा आकार घेत असल्याचे दिसतेय. ट्रेलरमधील प्रसंग या नात्याची केवळ भावनिक बाजूच नव्हे, तर त्यातील सहज विनोद आणि मनोरंजनही समोर आणतात.

दिग्दर्शक महेश लिमये म्हणतात, “आजोबा आणि नातवाचं नातं पडद्यावर मांडताना मला त्यातील सहजता आणि त्यांच्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग महत्त्वाचे वाटले. या नात्यात कधी गंमत असते, कधी मतभेद असतात, तर कधी शब्दांत न मावणारी जवळीक असते. ‘आदि अनंत’मधून हे सगळे पैलू प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट बघताना प्रेक्षकांना त्यांच्या घरातल्या माणसांची आठवण नक्की येईल. यात आजोबा – नातवाचं नातं असले तरीही हा प्रत्येक नात्याचा चित्रपट आहे, जो संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा.’’

निर्माते समीर हंपी आणि अनिकेत मराठे सांगतात, “‘आदि अनंत’ची गोष्ट तिच्यातील साधेपणामुळे आणि नात्यांमधील वेगळेपणामुळे आम्हाला भावली. आजच्या धावपळीच्या आयुष्यात कुटुंबासोबत घालवलेले क्षण किती महत्त्वाचे असतात, हे या चित्रपटातून अधोरेखित होते. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी या कथेला खास रंगत देते. मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना आपुलकीची जाणीव करून देणारा हा कौटुंबिक चित्रपट आहे.”

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत ‘आदि अनंत’ची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह यांनी सहनिर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासह सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर यांच्या भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. येत्या १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे