Breaking
अपघातदेश-विदेशब्रेकिंग

अहमदाबादहून टेक ऑफ केलेले एअर इंडिया चे विमान कोसळले

240 प्रवासी मृत्यूमुखी

0 3 2 9 4 9

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील सरदार वल्लभ भाई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी परिसरात आज 12 जून 2025 रोजी दुपारी एअर इंडियाचे विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे विमान लंडनकडे जाण्यासाठी निघाले असताना टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले. या विमानात दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्ससह एकूण 242 प्रवासी होते. या विमान अपघातात एकमेव तरुण प्रवासी बचावला असून विमानातील सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येते. टेक ऑफनंतर विमान सुमारे 800 फूट उंचीवर गेले आणि त्यानंतर अचानक खाली कोसळू लागले. काही क्षणांतच हे विमान एका रहिवासी भागात कोसळले आणि त्याला आग लागली. हे विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले, त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनाही इजा झाली. या फ्लाइटमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीही प्रवास करत होते.

रमेश विश्वकुमार हे युवा प्रवासी बचावले…
पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातातून एक व्यक्ती जिवंत बचावली आहे. रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे. यामुळे विमानातील अजून काही लोक जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बचावकार्य वेगाने आणि पूर्ण ताकदीने सुरू आहे.
या अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वकुमारने नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती दिली. आमच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीस सेकंदांत एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर विमान कोसळले. मी जेव्हा शुद्धीवर आलो, तेव्हा माझ्या आजूबाजूला अनेक मृतदेह पडले होते. मी खूप घाबरलो होतो. मी उभा राहिलो. सैरावैरा पळू लागलो. माझ्या आजूबाजूला विमानाचे तुकडे विखुरले होते. मला कोणीतरी पकडले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले.” असे रमेश विश्वकुमार यांनी सांगितले.

रमेश विश्वकुमार हे ब्रिटीश नागरिक आहेत. ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते. त्यांचा भाऊ अजय कुमार यांच्यासोबत ते युकेला परतत होते. त्यावेळी हा विमान अपघात झाला.

दरम्यान एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI171 या विमानाने 12 जून रोजी दुपारी 1 वाजून 39 मिनिटांनी अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रूचाही समावेश होता. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे. तसेच प्रवाशांमध्ये ११ लहान मुलं आणि २ नवजात बालकांचाही समावेश होता अशी माहितीही समोर आली आहे.

एअर इंडिया AI १७१ विमान अपघात : प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष कार्यान्वित
मुंबई, दि. १२ : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI १७१ या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे

या विमान अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि साहाय्यासाठी ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९ भ्रमणध्वनी ९३२१५८७१४३, आपत्कालीन मदत क्रमांक १०७० या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 9 4 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे