ब्रेकिंग
पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश; शेतमालकिणीचे मंगळसूत्र लंपास
0
4
8
5
2
0
पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश; शेतमालकिणीचे मंगळसूत्र लंपास
भेंडाळीतील घटना; महिला शेतमजुराविरुद्ध सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा
किरण कुमार आवारे …
शिरवाडे वाकद : निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून शेतमालकिणीच्या कपाटातील सुमारे ५९,८०० रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका महिला शेतमजुराविरुद्ध सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भेंडाळी येथील धोंडाईमळा शिवारात सौ. संगिता भागवत खालकर (वय ४८) यांचे शेत व शेतातील घर आहे. ३० जून २०२६ रोजी दुपारी शेतात काम सुरू असताना औरंगपूर येथील राहणारी एक महिला शेतमजूर तेथे काम करत होती. दुपारी सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास तहान लागल्याचे सांगून तिने पाणी पिण्यासाठी घरात जाण्याची परवानगी घेतली.
मात्र, पाणी घेण्याऐवजी तिने घरातील लाकडी कपाट उघडून त्यामधील १ तोळा ६ ग्रॅम वजनाचे, १२४ गोलाकार मणी व दोन सोन्याच्या वाट्यांचा समावेश असलेले सुमारे ५९ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र चोरून नेल्याचा आरोप आहे.
चोरीचा प्रकार काही दिवसांनी निदर्शनास आल्यानंतर सौ. खालकर यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ५ जुलै २०२६ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) व ३३१(३) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आहिरे करीत आहेत. घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात या चोरीची चर्चा सुरू आहे.
0
4
8
5
2
0


