0
4
2
9
5
7
“सुविचार गौरव” पुरस्कार जाहीर
अभिनेत्री निवेदिता सराफ, पार्श्वगायिका सावनी रविंद्र व अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा समावेश
नाशिक दि. ३० (प्रतिनिधी) :- समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची “सुविचार गौरव” पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात अभिनेत्री निवेदिता सराफ, पार्श्वगायिका सावनी रविंद्र व अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा समावेश आहे.
सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या विविध १२ क्षेत्रातील पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने संयोजक आकाश पगार यांनी आज जाहीर केली.
यामध्ये कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री निवेदिता सराफ यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल ६७ वा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांना सुविचार नाशिक गौरव या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
जेष्ठ नेते श्रीराम शेटे यांना “जीवन गौरव” पुरस्काराने तसेच कर्करोग तज्ञ डॉ. शैलेश बोंदर्डे (वैद्यकीय), उद्योजक जितेंद्र शहा (उद्योग), निरुपा तायडे (उद्योग महिला), मनीषा बागुल (शैक्षणिक), सुवर्णा जगताप (सहकार), सुनील मोरे (सामाजिक), कैलास देवरे (कृषी), फुटबॉलपटू प्रतीक्षा देवांग (क्रीडा) यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
गुरुवार दि. ०६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते तर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शालेय शिक्षण मंत्री ना.दादा भुसे व ‘सुविचार मंच’चे संस्थापक अॅड. रविंद्र पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली आहे.
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिंचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा सन्मान करण्यासाठी सुविचार गौरव पुरस्कार देण्यात येतात. यंदाचे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे पाचवे पर्व आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रवेशिकांसाठी ९४२१५६३५५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ‘सुविचार गौरव’च्या वतीने प्रसिद्धीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात करण्यात आले आहे.
0
4
2
9
5
7




