“CID हा भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या TV शोज पैकी एक आहे – दयानंद शेट्टी
“CID हा भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या TV शोज पैकी एक आहे, कारण, तो नेहमी काळाच्या पुढे असायचा”: CID मधील अभिनेता दयानंद शेट्टी
गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणारा अत्यंत लोकप्रिय झालेला CID हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर 21 डिसेंबर 2024 पासून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल. शिवाजी साटम (ACP प्रद्युमन), दयानंद शेट्टी (दया) आणि आदित्य श्रीवास्तव (अभिजीत) हे कलाकार पुन्हा एकदा त्याच्या गाजलेल्या भूमिकेत दिसणार आहेत. एका दिलखुलास मुलाखतीत या शोच्या पुनरागमनाबद्दल, पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्याबद्दल असलेला रोमांच दयानंद शेट्टीच्या बोलण्यातून व्यक्त झाला. त्याने सांगितले की, नव्या सीझनमध्ये जुन्या आठवणींचे क्षण असतील आणि नवीन, वेधक केसिस व बरेच काही असेल.
CID परत येत आहे! इतक्या वर्षांनंतर पुन्हा दयाच्या भूमिकेत शिरताना कसे वाटते आहे?
फक्त मीच नाही, तर संपूर्ण टीम खूप रोमांचित आहे. आणि त्याहीपेक्षा आमच्या चाहत्यांचा उत्साह तर विचारुच नका! आम्ही 6 वर्षांनी परत येत आहोत. आमच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्यांच्या भावना पाहिल्या की वाटते, हा शो आम्ही इतक्या लवकर बंद करायला नको होता. लोक या शो ला अजून फॉलो करतात, जुने एपिसोड आवडीने बघतात. लोक हा शो यूट्यूबवर, बसमध्ये किंवा टॅक्सीत बसूनही बघतात. असे वाटते की, त्यांचे केवळ या मालिकेशीच नाही, तर त्यातील व्यक्तिरेखांशीही एक नाते जडले आहे. त्यामुळे लोकांच्या आवडत्या दयाच्या रुपात परत येताना मला खूप आनंद होत आहे. हा दया आता CID च्या नवीन सीझनमध्ये बरेच दरवाजे तोडणार आहे.
इतकी वर्षे दयाची भूमिका करण्यातील सगळ्यात सुखद भाग काय आहे?
हा एक अद्भुत प्रवास आहे. यातला सगळ्यात आवडता भाग म्हणजे प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम. आम्ही कुठेही गेलो तरी असे कधी वाटलेच नाही, की आपला शो आता चालू नाही आहे. लोक सुरू असलेल्या मालिकांविषयी न बोलता CID विषयीच जास्त बोलत असत. हा शो अजूनही लोकांशी निगडीत आहे असे वाटायचे, जणू तो अजून चालूच असावा. याचे श्रेय प्रेक्षकांचे आहे. आमचे चाहते फारच निष्ठावंत आहेत. आजही काही चाहते माझा नंबर मिळवून मला व्हॉटस्अॅप मेसेज पाठवत असतात. मी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही, पण लोक CID चे मीम्स शेअर करतात, त्यातल्या काही प्रसिद्ध संवादांविषयी बोलतात, हे मला माहीत आहे. त्यांचे प्रेम पाहून मी खरोखर भारावून जातो.
CID पुन्हा सुरू होत आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद तुला काशाबद्दल आहे? यावेळी तुमच्यासमोर काही आव्हाने आहेत का?
जेव्हा तुम्ही त्याच त्याच लोकांसोबत अनेक वर्षे काम करता, तेव्हा तुम्हाला एका कुटुंबासारखे वाटू लागते. त्यामुळे, माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा भाग हा आहे की, मला CID च्या टीमसोबत काम करण्याची संधी पुन्हा मिळणार आहे. यावेळी, आव्हान हे आहे की, लोकांनी पुन्हा प्रेमात पडावे असा शो आम्हाला सादर करायचा आहे. खास करून हा शो चालू नसताना त्यांनी आम्हाला जे प्रेम दिले आहे, त्यामुळे आता ही आमची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, CID चे संवाद खूप गाजले आहेत. यावेळी आम्ही संवाद लिहिण्याचे आणि ते बोलण्याचे काम करू पण ते किती गाजतात, हे तर लोकच ठरवतील. लोकांमुळेच त्यांची मीम्स बनतात किंवा ते रोजच्या संभाषणाचा भाग बनतात. उदाहरणार्थ, नुसते दार बघितले तरी लोकांना “दया, दरवाजा तोड दो!” हा संवाद आठवतो. त्यामुळे, हे आमच्या नियंत्रणात नाही. फक्त प्रेक्षकांचे प्रेम आणि त्यांची क्रिएटिव्हिटी यामुळेच हे संवाद जिवंत राहू शकतात. त्यांचे CID शी असलेले नातेच खास आहे, आणि त्यांच्यासाठी आम्ही परत येत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.
‘बाहुबली-कटप्पा’पेक्षा एक मोठे रहस्य हे आहे की, इंस्पेक्टर अभिजीतने दयाला का मारले?
इंस्पेक्टर अभिजीतने दयाला का मारले हे कोणालाच, चाहत्यांनाही माहीत नाही. सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे. या गोष्टीमुळे लोकांना धक्का बसला होता आणि त्याचे उत्तर जाणून घेण्याचे कुतूहलही जागे झाले होते. पण, सगळ्या काहण्यांमध्ये कलटण्या असतातच ना! तुम्हाला 21 डिसेंबरलाच ते कळेल.
तुला हे पूर्वी कधी असे वाटले होते का की, CID मालिका इतकी गाजेल आणि मालिका बंद झाल्यावरही लोक तिची इतकी आठवण काढतील?
खरं सांगायचं तर, आम्ही जेव्हा पहिल्यांदा CID सुरू केली, तेव्हा आमच्यातल्या कोणालाच ही कल्पना नव्हती ही मालिका इतकी लोकप्रिय होईल आणि एकामागून एक दशके लोक या मालिकेवर प्रेम करतील. CID ने हा दर्जा मिळवला, त्याच्या मागे समस्त टीमचे परिश्रम आहेत- आमचे लेखक, दिग्दर्शक, सह-कलाकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या चाहत्यांनी दिलेले प्रेम. या गोष्टीचा मला अचंबा वाटतो की वेगवेगळ्या वयोगटातील, पिढ्यांमधील लोक अजूनही या मालिकेशी निगडीत आहेत. इतक्या लोकांसाठी ही मालिका इतकी जवळची झाली आहे हे पाहून मी भारावून जातो. अशा लोकप्रिय मालिकेत सहभागी असल्याची जाणीव मला नेहमीच आनंद देत राहील.
नवीन सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी नवीन काय आहे? त्यात काही नवीन घटक आहेत की, तोच फॉरमॅट आहे?
आपण कितीही आधुनिक झालो, आपण कितीही प्रगती केली, तरी माणसांना एकमेकांशी जोडतात, त्यांना हेलावून सोडतात त्या भावनाच असतात. CID हा शो भारतात सर्वात जास्त काळ चाललेल्या मालिकांपैकी एक आहे, कारण तो पहिल्यापासून काळाच्या पुढे होता. फॉरेन्सिक सायन्ससारखी संकल्पना आम्ही दाखल केली होती, जी गोष्ट त्याआधी फारशी ज्ञात नव्हती. उदाहरणार्थ, 2004-05 मध्ये, एका भागात नार्को-अॅनालिसिस टेस्ट दाखवली होती. त्यावेळी, लोकांना असे वाटले होते की ही गोष्ट काल्पनिक आहे. एखाद्याला इंजेक्शन देऊन, त्याच्या डोक्याला इलेक्ट्रॉड जोडून तो माणूस खरं बोलत आहे की खोटं हे कसं काय कळू शकेल? पण आज, या पद्धती सगळ्यांना माहीत झाल्या आहेत. लोकांना माहीत नसलेली प्रगत टेक्नॉलॉजी दाखवून CID ने नेहमी पुढचे पाऊल टाकले आहे. आता यापुढे, आम्हाला आणखी नाविन्यपूर्णता आणावी लागेल. लोकांना कंटेंट आवडावा यासाठी नवीन संशोधने, प्रगती आणि वेधक गोष्टी आणाव्या लागतील. आणि त्याच बरोबर CID ची ओळख असलेला त्याचा गाभा तसाच जपावा लागेल. शेवटी, ही सुद्धा माणसांच्या नात्याचीच गोष्ट आहे. लोकांना अशा गोष्टी आवडतात, ज्यामध्ये भावना असतात, नाती असतात आणि नाट्य आणि विनोद यांचे हवहवेसे क्षण असतात. लोकांच्या पसंतीस उतरण्यासाठी एक असे पॅकेज असावे लागते, ज्यामध्ये इनोव्हेशन आणि मानवी भावनांचे आकर्षण यांचे सुंदर मिश्रण असेल.
CID चा प्रेक्षकवर्ग अत्यंत ईमानदार आहे. नवीन सीझनची वाट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी तू काय संदेश देशील?
इतकी वर्षे आमच्याशी निष्ठावान राहिलेल्या आमच्या सगळ्या चाहत्यांविषयी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. प्रेक्षकहो, तुमचे प्रेम आणि निष्ठा हाच या मालिकेचा प्रेरणास्रोत आहे. मला माहीत आहे की, तुम्ही या मालिकेच्या नव्या सीझनची उत्सुकतेने वाट बघत आहात. मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही केलेल्या प्रतीक्षेचे फळ तुम्हाला मिळेल. तुमचा उत्साह, तुमचे मेसेजिस आणि तुमचे समर्थन यामुळे इतकी वर्षे ही मालिका चालली आणि त्यानंतरही जिवंत राहिली. नवा सीझन देखील तसाच रोमांचक आणि मनोरंजक व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे आणि आम्हाला आशा आहे की, हा सीझन देखील तुमच्या जीवनात आनंद, रहस्य आणि न्याय भावना घेऊन येईल. CID तुमच्यामुळेच परत येत आहे!
CID सुरू होत आहे 21 डिसेंबर रोजी आणि दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता त्याचे प्रसारण करण्यात येईल सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!