गुन्हेगारी
अवैध सावकारीतून महिलेस धमक्या; भाऊसाहेब बोरगुडे यांचे विरोधात निफाड पोलिसांत गुन्हा

0
4
5
5
0
9
अवैध सावकारीतून महिलेस धमक्या; भाऊसाहेब बोरगुडे यांचे विरोधात निफाड पोलिसांत गुन्हा
किरण कुमार आवारे…
शिरवाडे वाकद :- निफाड शहरातील एका महिला व्यावसायिकेला अवैध सावकारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करून शिवीगाळ, धमक्या आणि बेकायदेशीर वसुली केल्याप्रकरणी नैताळे ता. निफाड येथील भाऊसाहेब पंडित बोरगुडे याच्या विरोधात निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निफाडच्या गायत्रीनगर येथील ३६ वर्षीय महिलेने निफाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर महिला ही साडी विक्री व्यवसाय करते. व्यवसाय वाढविण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांनी भाऊसाहेब बोरगुडे याच्याकडून व्याजाने रक्कम घेतली होती. सुरुवातीला एक लाख रुपयांची गरज असताना आरोपीने दोन लाख रुपयांचा धनादेश देऊन त्यातून मोठी रक्कम व्याज व इतर कारणांखाली कापून घेतले. यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये पुन्हा दोन लाख रुपये घेतले असता, आरोपीने मोठ्या प्रमाणात व्याज आकारले. फिर्यादीने व्याजासह सुमारे २ लाख ६० हजार रुपये परत केल्यानंतरही आरोपीने आणखी ६० हजार रुपयांची मागणी केली. तसेच वारंवार फोन करून अश्लील शिवीगाळ, दुकानात येऊन दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, इतर काही व्यक्तींनाही आरोपीने अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकवून मोठ्या प्रमाणात व्याज वसूल केले आहे. जमिनीचे साठेखत, कोरे धनादेश आणि मुक्त्यारपत्र घेऊन बेकायदेशीर वसुली केल्याचाही फिर्यादीत आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात भा.न्या.संहिता कलम ३०८, ३५१(२), ३५२ तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम ३९, ४५, ४८ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोनल पडोळ अधिक तपास करीत आहेत.
0
4
5
5
0
9
