युवकांनी रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करावी : मंत्री छगन भुजबळ
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन
नाशिक, दिनांक : 18 ऑगस्ट 2024 (जिमाका वृत्तसेवा) : कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छूक उमदेवारांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शासनाने विविध योजनांच्या माध्यामातून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. यासाठी युवकांनी रोजगाराभिमुख कौशल्ये आत्मसात करावी. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज येवला शहरातील माऊली लॉन्स येथे आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे, सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी, प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे, गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार यांच्यासह अधिकारी, कंपनी आस्थापना नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे शाळा व महाविद्यालयीन शिक्षणानंतर युवकांना रोजगाराच्या संधी वृद्धींगत करण्यासाठी १८ ते ३५ वयोगटातील युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षण कालावधीत इयत्ता १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना रूपये ६ हजार, आयटीआय व पदविका उत्तीर्ण उमदेवारांना रूपये ८ हजार तर पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना रूपये १० हजार इतके दरमहा विद्यावेतन दिले जात आहे. यासाठी शासनाने ५ हजार ५०० कोटी निधीची तरतूद केलेली आहे. जर्मनी देशात ४ लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. युवकांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.
मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले, आज या ठिकाणी २४ नामांकीत कंपन्यांसोबतच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळ नाशिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ नाशिक, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नाशिक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नाशिक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ मर्या., वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या., महात्मा फुले विकास महामंडळ मर्या., महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक विकास महामंडळ यांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. या विविध विकास महामंडळाच्या माध्यामातून युवकांना मंडळाच्या योजना, व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्शन व अर्थसहाय्य याबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
आज माऊली लॉन्स येवला येथे सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात महिंद्रा अँड महिंद्रा लि., नाशिक प्लांट, बॉश लिमिटेड, नाशिक, डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि., युवाशक्ती फाऊंडेशन, नाशिक, रिंग प्लस ॲक्वा, एम.डी. ऑटो इंडस्ट्रीज, बजाज सन्स लि., नाशिक, सॅमसोनाईट, नाशिक, मदरसन ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, अँन्ड इंजिनिअरिंग, नाशिक, ऑटोमेक, नाशिक, मोसदोरफर इंडिया प्रा. लि., नाशिक, हिताची अस्टीमो ब्रेक सिस्टीम्स इंडीया प्रा. लि. जळगाव, डिस्टील एज्युकेशन अँन्ड टेक्नॉ. प्रा.ली, रामवी मॅनेजमेंट सर्व्हिसेस, यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किल्स, नाशिक, बिव्हीजी इंडीया प्रा. लि., मिराक्वई व्हेन्च्युअर्स प्रा. लि., गोविंदा एचआर सर्व्हिसेस, सक्सेस जॉब प्लेसमेंट अशा २४ नामांकित कंपन्या व नियोक्ते यांनी सहभागी झाले. इयत्ता दहावी, बारावी, कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, डिप्लोमा / डिग्री इंजिनिअर, फार्मसी इत्यादी विविध शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी ३६४८ पदांकरिता रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे यांनी केले. यावेळी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित असेलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या नोकरीची नियुक्तीपत्रांचे वाटप मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. येथे उभारण्यात आलेल्या स्टॉल्सला मंत्री छगन भुजबळ यांनी भेट दिली.