नम्रतेची मूर्ती – राजयोगिनी दादी प्रकाशमणिजी
|| ओम शांति ||
नम्रतेची मूर्ती – राजयोगिनी दादी प्रकाशमणिजी
२५ ऑगस्ट प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माजी आंतरराष्ट्रीय मुख्य प्रशासिका (१९६९ ते २००७) डॉ. दादी प्रकाशमणीजी यांची १७ वी पुण्यतिथी “जागतिक बंधुता दिवस” म्हणून साजरी करण्यात येत आहे.त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याविषयी घेतलेला मागोवा…….
दादी प्रकाशमणिजींचे बालपणीचे नाव रमा होते. त्यांचे वडील ज्योतिषी होते. ते त्यांना ‘मीरा’ नावाने संबोधत असत. लहान असतानाच त्या ‘ओम मंडळी’ कडे आकर्षित झाल्या आणि दहावीची परिक्षा दिल्यावर यज्ञ सेवेमध्ये सक्रीय झाल्या. त्यांच्या बहिणी व इतर परिवारातील इतर सदस्य ही समर्पित झाले. ब्रह्माबाबा प्रेमाने त्यांना ‘कुमारका’ असे संबोधत.डिसेंबर १९६८ मध्ये जेव्हा त्या काही भावा – बहिणींचा ग्रुप घेऊन मधुबनला आल्या होत्या तेव्हा बाबांनी त्यांना तेथेच थांबवून घेतले आणि काही दिवसांतच अनेक युक्त्या वापरून संस्थेच्या कामकाजाविषयी संपूर्ण ओळख करून दिली, एक दिवस बाबांनी गप्पा-गोष्टी करता-करता त्यांना असे विचारले की बेटा, जर बाबा अलिप्त झाले तर तू कामकाज सांभाळू शकशील का? बाबांना दादीजीनी मोठ्या दिमाखात उत्तर दिले हो बाबा, का नाही. नंतर त्यांना अशी जाणीव झाली की बाबांनी ही गोष्ट खूपच गांभिर्याने विचारली होती. यज्ञाचे सर्व करण्यासाठी तर सेवेत निमित्त आणि निर्माण भाव दादीमध्ये स्नेह आणि शक्तीचे अद्भुत संतुलन होते. सर्वांमधील विशेषता ओळखून त्यांचा सेवेस उपयोग करणे, सर्वांना स्नेह आणि सन्मान देणे, कोणाच्याच कमतरता मनात न ठेवता त्यांना आईसारखा स्नेह देऊन प्रगती पथावर नेणे इत्यादी गुण दादींमध्ये होते. त्यामुळे सर्वजण एका सुत्रात गुंफले गेले होते,जसे दादींकडून सर्वांनाच मनापासून स्नेह व सन्मान मिळायचा तसाच सर्वच जण मनापासून त्यांचा मान सन्मान ठेवत, ‘मी’ या शब्दाचा उपयोग त्यांच्याकडून नाममात्र वापरला गेला असेल. त्या नेहमीच ‘निमित्त आणि निर्माण’ भावनेजी सेवा करत.कितीही मोठी जबाबदारी असली तरी, त्या नेहमी म्हणत-बाबा जबाबदारी घेण्यास आहेत. अशा निश्वयामुळे त्या सदा निश्चिंत रहात, जेव्हा त्या एखाद्या इमारतीचे भूमिपूजन करत तेव्हाच त्यांच्या संपूर्णनतेची वेळ निश्चिंत करत. त्यांच्या या समजदारीमुळेच ज्ञानसरोवर आणि शांतीवनची निर्मिती ठरवलेल्या कालावधीत पूर्ण झाली होती. दादीजी सर्वबहिणींना आपल्या सख्या मानत आणि सगळ्याजणी आपल्या ही पेक्षा जास्त प्रगती करोत, हीच त्यांची शुभकामना होती.त्या स्वच्छता प्रिय होत्या मातांकरता त्यांना विशेष स्नेह होता, त्यांची प्रगती व्हावी म्हणून त्या काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन करत असत. दादी दिवसातून ४ वेळा मुरली वाचन करत असत, विशेषत्वाने रात्री झोपण्यापूर्वी निश्चितच वाचत. यज्ञाचे कार्य त्या अतिशय काटकसरीने करत. कोणताही कार्यक्रम अगदी साधारणही नसावा किंवा फार भपकेबाज ही नसावा परंतू त्यातील सुवर्णमध्य त्या नेहमी काढत. त्या स्वच्छता प्रिय होत्या जसेच नम्रतेची देवता होत्या.मोठ-मोठ्या साधू-संतांना, मंत्र्यांना,पंतप्रधानांना व राष्ट्रपतींना भेटताना त्या हात जोडून अभिवादन करत. त्यांचे म्हणणे होते की इतक्या मोठ्या संस्थेची प्रमुख (हेड) स्वतःला समजणे म्हणजे ‘हेडेक’ (डोकेदुखी) करून घेणे आहे म्हणूनच त्या स्वत:ला नेहमी सेवाधारी समजत व सहज रहात होत्या. नेहमीच उमंग-उत्साहात राहणे व इतरांनाही उमंग-उत्साह देणे ‘ हा त्यांचा नॅचरल संस्कार होता. कोणत्या ही गोष्टीचा निर्णय निमिषात घेण्याइतकी त्यांची बुद्धि दिव्य आणि निर्मळ होती.आपल्या हयाच गुणांमुळे व विशेषतांमुळे, जवळपास ३७ वर्षे त्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका होत्या, त्यांच्या सेवा काळात संस्थेचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. ज्याचे फलित म्हणून विश्वातील जवळपास १४० देशांमध्ये हजारों ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्र आहेत व लाखो बंधू-भगिनी सेवा करत आहेत.जगातील सर्वांत मोठी महिला एन.जी.ओ. म्हणून संस्था ओळखली जाते. विश्वात मानवतेची सेवा करण्यासाठी,शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करण्यासाठी संस्थेला यू.एन.कडून अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत.
आज २५ ऑगस्ट प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माजी आंतरराष्ट्रीय मुख्य प्रशासिका (१९६९ ते २००७) डॉ. दादी प्रकाशमणीजी यांची १७ वी पुण्यतिथी “जागतिक बंधुता दिवस” म्हणून साजरी करण्यात येत आहे.स्व.दादी प्रकाशमणीजी यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
– राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी,
मुख्य संचलिका, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, नाशिक जिल्हा