0
4
2
9
5
7
सागर निकाळे, निफाड (प्रतिनिधी)
महसूल दिन सप्ताह निमित्त निफाड तहसील कार्यालयात सोमवार दि ४ ऑगस्ट रोजी सत्कार समारंभ पार पडला. महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत मोलाचे योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार श्री. विशाल नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यात निवडणूक नायब तहसीलदार श्री राहुल मुळीक, मंडळ अधिकारी श्री ज्ञानेश्वर पगार, तलाठी श्री राहुल अहिरे, श्री नितेश निंबाळकर, अव्वल कारकून श्रीम वैशाली हिंडे, महसूल सहायक विजय चव्हाण व , गणेश कुमावत यांचा यामध्ये समावेश होता. मागील वर्षभरात क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या श्री शंकर खडांगळे, प्रसाद देशमुख, लक्ष्मीकांत शिंदे , दिपक पवार, प्रफुल्ल गवळी यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेत त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमात डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी आपल्या भाषणात महसूल विभागाच्या कार्यपद्धतीत झालेल्या सकारात्मक बदलांबद्दल समाधान व्यक्त केले. निफाड तालुका महसूल कामकाजाच्या दृष्टीने सातत्याने प्रगती करत आहे. पारदर्शकता, तत्परता आणि जनसेवेचा दृष्टिकोन ठेवून काम करणं हीच आपल्या विभागाची ओळख व्हावी, असे त्यांनी सांगितले.
तहसीलदार श्री. विशाल नाईकवाडे यांनी आपल्या मनोगतातून,महसूल दिन सप्ताह हा केवळ एक औपचारिकता नसून, हा आपल्या कामाचा आढावा घेण्याचा आणि उत्तम कामगिरी करणाऱ्यांना प्रेरणा देण्याचा एक उपक्रम आहे,असे सांगत सर्व सहकाऱ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संयोजन तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रकारे केले होते. यावेळी विभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. हा गौरव सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला असून, महसूल विभागाच्या अधिक गुणवत्तापूर्ण कार्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरला आहे.
0
4
2
9
5
7



