कुणी कितीही वल्गना केल्या तरी घटना बदलणे अशक्य – अॅड. सुधाकर आव्हाड
स्व. रमेश केंगे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ व्याख्यान
नाशिक :प्रतिनिधी
कुणी कितीही वल्गना करीत असेल तरीही राज्य घटनेला कुणीही हात लाऊ शकणार नाही. त्याचे मुळ कारण म्हणजे घटना समितीने निर्मितीच अशी केली आहे की कुणीही असे करू शकत नाही. कुणी चुकुन तसा प्रयत्न केला तरी त्यावरील उपायदेखील घटनेनेच सांगून ठेवलेले आहे, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. डॉ. सुधाकर आव्हाड यांनी येथे केले.
वसंत व्याख्यानमालेत स्व. रमेश केंगे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ झालेल्या व्याख्यानात ते ‘भारतीय संविधान- अमृत मंथन’ या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. रमेश केंगे यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष अँड. जयंत जायभावे यांनी परिचय करून दिला. अँड. भास्करराव पवार, परिक्षित केंगे व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. संविधान निर्मितीच्या वेळची राजकीय पार्श्वभुमी डॉ. आव्हाड यांनी यावेळी विशद केली. ते म्हणाले की, जो पर्यंत सूर्य- चंद्र आहे, तोपर्यंत भारतीय राज्य घटना चिरंतन राहणार आहे. त्याचे मुळ कारण म्हणजे घटना समितीने निर्मितीच अशी केली आहे की कुणीही त्यात मोडतोड करू शकत नाही. कुणी चुकुन तसा प्रयत्न केला तरी त्यावरील उपायदेखील घटनेनेच सांगून ठेवलेले आहे. सर्वोच्च न्यायालयात आजही घटनाकारानी त्याकाळी केलेल्या चर्चेनुसार सल्ला-मसलत होत असते. घटनेचा असा अभ्यास करण्याची सूचनादेखील घटणाकारांनीच करून ठेवलेली आहे. जागतिक शांतता हा आपल्या संविधानाने जगाला दिलेला महत्वाचा संदेश आहे. भारताची घटना जगात एकमेव आहे, ज्यामध्ये महिलांनाही स्थान देण्यात आले आहे. गीतेत जसे पानापानात भगवान श्रीकृष्ण दिसतात, तसे राज्य घटनेत प्रत्येक पानात आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिसतात. संविधानाचे हे महत्व अधोरेखित करताना त्यांनी जगभरातील अनेक दाखले देत तत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. १८५७ चा उठाव आणि त्यापूर्वीचा काळ या परिस्थितीची पार्श्वभूमी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य घटना समितीतील २९२ सदस्यांचे योगदान, तत्कालीन परिस्थिती, घटना स्वीकारल्याचा प्रसंग आदींचाही त्यांनी उहापोह केला. समुद्र मंथनातून जसे अमृत मिळाले; तद्वतच २९२ सदस्यांनी सलग केलेल्या मंथनातून आपल्याला हा अमृत ग्रंथ मिळाला आहे. सर बेनेगल नरसिंह राव या समितीचे सल्लागार होते. त्यांनी जगभर फिरून सगळ्या राज्य घटनांचा अभ्यास केला. त्यावरील हे मंथन होते. त्यामुळे हा ग्रंथ म्हणजे आपल्यासाठी ज्ञान कलशच आहे. घटनेचा मुळ मसुदा सर बेनेगल नरसिंह राव यांनी लिहिला. त्यावर मसुदा समितीने काम केले. या समितीतही बाबासाहेबांसारखे विद्वान होते. त्या सर्वानी भविष्याचाही विचार केलेला मार्गदर्शक तत्वांतून दिसुन येतो. असा मजबूत विचार असलेल्या या ज्ञान कलशाला हात लावण्याची हिंमतही कुणी करू शकणार नाही असा बंदोबस्त घटनेतच करून ठेवलेला आहे. असे चुकीचे प्रयत्न कुणी केलेच तर सर्वोच्च न्यायालय ते हाणून पाडू शकेल, अशी ही तरतुद आहे असेही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र गोवा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड जयंत जायभावे, राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिकः विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे,डॉ. मुक्तेश्वर मूनशेट्टीवार, उद्योजक बुधाजी पानसरे,अँड.अजय निकम,प्रा. संगीता बाफना,अँड.चिंतामण हाडपे यांच्यासह श्रोते उपस्थित होते.
सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मीना परुळकर- निकम प्रस्तुत ‘श्रेयलता’ हा गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये सौ. परुळकर- निकम व श्रेयसी राय यांनी लता दिदींची श्रेया घोषाल यांनी गायीलेली सदाबहार हिंदी गिते सादर केली. तर शिल्पा फासे यांनी आपल्या खूमासदार शैलीत निवेदन केले.