
0
2
5
6
2
9
सिडको सेवाकेंद्राच्या चंदादीदी यांचे देहावसान, नाशिक सहित मुख्यालय माउंट अबू येथून बी के सदस्य उपस्थित
नाशिक /प्रतिनिधी
चंदादीदी ह्या मूर्ती लहान किर्ती महान अशा होत्या. त्यांनी चंदना प्रमाणे आपला देह ईश्वरीय कार्यासाठी समर्पित केला. त्यांनी ह्या जन्मात केलेल्या श्रेष्ठ कर्मामुळेच त्यांना श्रेष्ठ गती मिळेल. त्यांनी केलेल्या ईश्वरीय सेवेचा सुगंध चिरकाळ दरवळत राहील. असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संस्थेच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या सिडको सेवा केंद्रात ४० वर्षांपासून समर्पित जीवन व्यतीत करणाऱ्या राजयोगिनी बालब्रह्मचारी ब्रह्माकुमारी चंदादीदी यांनी दिनांक ४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजता ब्रह्माकुमारी संस्थेच्या ट्रॅफिक कंट्रोल गीतावर भगवंताचे स्मरण करून जुना देह त्यागला. दिनांक ५ फेब्रुवारी रोजी श्रद्धांजली व्यक्त करतांना ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी बोलत होत्या.
४.५ महिन्यांपासून चंदा दीदींची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना जेवण जात नव्हते. मात्र अशोका मेकओव्हर हॉस्पिटलमध्ये राहून त्यांनी प्रकृतीमध्ये सुधारणा केली. पुन्हा काही दिवसानंतर प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिक रोड येथील आश्यूअर्ड केअर प्लस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. तब्बल१२ दिवस त्यांनी आपल्या आध्यात्मिक बलाद्वारे प्रकृतीवर विजय प्राप्त केला आणि आपल्या इच्छाशक्ती द्वारे मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी आपला जुना देह त्यागला.
अशा या दिव्यात्म्याची जीवन कहाणी सुद्धा खूप आगळी वेगळी आहे. दिनांक १७ ऑगस्ट १९६५ रोजी नाशिक रोड येथील गोपालदास रामचंदानी व कृष्णावंती गोपालदास रामचंदानी या तांपत्त्याच्या घरी चंदा दीदी या महान आत्म्याने जन्म घेतला. आठ जणांचे मोठे कुटुंब घेऊन गोपालदास व कृष्णावंती यांनी हा परिवार सांभाळाला. गोपालदास रामचंदानी हे किराणा मालाचे व्यापारी होते. सगळ्या मुलांचे शिक्षण गोपालदास यांनी व्यवस्थित करून घेतले. मात्र लहानपणी पाच महिन्याची असताना चंदा यांना आजारपणात पोलिओची बाधा झाली. मात्र अपंगत्वाचे ओझे मनावर न बाळगता चंदादीदी यांनी बाल जेशू सेवासदन हाईस्कूल, नाशिक रोड येथून इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात हुशार असलेल्या चंदा दीदी ह्या घरातील सर्व काम अतिशय स्फूर्तीने करीत असे.
याच दरम्यान आई कृष्णवंती व त्यांची बहीण सरस्वती माता या ब्रह्माकुमारी संस्थेच्या सान्निध्यात आल्या. पैकी सरस्वती माता ह्या ब्रह्माकुमारी संस्थेच्या अधिक जवळ आल्या व त्यांनी ईश्वरीय ज्ञानाचा प्रसार आपल्या घरात चांगल्या पद्धतीने केला. आपल्या छोट्या मुलीला अर्थात चंदादीदी यांना नेहमीच घरातील काबाडकष्ट करताना गोपालदास यांना वाईट वाटत असे. हिचा सुद्धा विवाह लावून द्यावा असे त्याच्या मनात येत असे मात्र चंदादीदी यांनी मी विवाह करणार नाही असे त्यांना निक्षून सांगितले. तेव्हा मात्र गोपालदास यांनी स्वतःहून चंदादीदी यांना सांगितले की तू सुद्धा सरस्वती माता यांच्यासोबत ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये जात जा. तेव्हापासून वयाच्या १६ व्या वर्षी दहावी झाल्यानंतर चंदा दीदी या ब्रह्माकुमारी संस्थेच्या सानिध्यात आल्या. त्यांचा साप्ताहिक कोर्स नाशिक रोडच्या ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी केला. त्यावेळेस नाशिक रोड येथील ब्रह्माकुमारी पारू दीदी यांच्या राहत्या घरी गिडवाणी सदन येथे ब्रह्माकुमारी संस्थेचे ईश्वरीय कार्य चालत असे. तत्कालीन नाशिक सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी गीता दीदी यांच्या प्रेरणेने चंदादीदी ह्या गुरुवार व रविवारी पंचवटी स्थित सेवा केंद्रात ईश्वरीय सेवा देऊ लागल्या. पुढे नाशिकरोड येथे मंदार गणेश या अपार्टमेंट मध्ये नाशिकरोड सेवा केंद्र सुरू झाले. ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांच्यासोबत चंदादीदी यांनी ७ वर्ष ईश्वरी सेवा दिली.
राणेनगर सेवा केंद्र उदयास आल्यानंतर ब्रह्माकुमारी विना दीदी यांच्या सोबत सिडको सेवा केंद्रात सेवा देण्याची जबाबदारी चंदादीदी यांच्याकडे सोपवण्यात आली.
एका पायाने अधू असताना सुद्धा कुठल्याही प्रकारे आपल्या अपंगत्वाचे भांडवल न करता चंदादीदी यांनी अतिशय मेहनतीने मनोभावे ईश्वरीय सेवा केली. येणाऱ्या प्रत्येक ब्रह्माकुमारी सदस्यांना मातृत्व प्रमाणे प्रेम देऊन त्यांनी त्यांची ईश्वरीय पालना केली. प्रत्येकाची आस्थेने त्या विचारपूस करीत. कधी कोणी बरेच दिवस सेवा केंद्रात न दिसल्यास त्यांना स्वतः फोन करून केंद्रात का येत नाही याची ते विचारपुस करीत. इतकेच काय बऱ्याच वेळेस कोणी सेवा केंद्रात येऊ शकले नसल्याकारणाने त्यांना गुरुवारचा प्रसाद ते स्वतः कोणाच्या ना कोणाच्या हस्ते घरपोच करत, इतकी त्यांची सर्वान प्रती प्रेमाची भावना होती. सिडको सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी विनादिदी यांच्या त्या राईट हॅन्ड होत्या विना दिदी यांना बऱ्याच वेळेस ईश्वरीय सेवेसाठी प्रवचन देण्यासाठी बाहेर जावे लागत असे. मात्र कोणतीही चिंता न करता चंदादीदी यांच्यावर सेवाकेंद्रची जबाबदारी देऊन विना दिदी या निश्चिंतपणे बाहेर जात असत. त्यांच्या पश्चात चंदा दीदी या सेवा केंद्राचा सर्व कारभार अतिशय चोख सांभाळत असत.
ब्रह्माकुमारी संस्थेच्या माउंट आबू मुख्यालयात सुद्धा चंदादीदी या नियमित जात असत. तेथे जाऊन आपले तपस्वी जीवन ते स्वावलंबी पणें व्यतित करत असत. येथील वरिष्ठ दादीजी व दीदीजी यांच्या त्या विशेष प्रिय होत्या. मात्र जबाबदारी पासून पळ काढून त्यांनी कधीही माउंट आबू येथे राहून आरामशीर जीवन जगण्याचा विचार केला नाही. त्यांनी कर्म हीच पूजा हा विचार समोर ठेवून दिलेल्या वेळेत त्या पुन्हा आपल्या कार्यस्थळी अर्थात सिडको सेवा केंद्रात येऊन ईश्वरी सेवेत रुजू होत असत. आपल्या लौकिक घरी आई-वडिलांकडे सुद्धा त्या अधिक दिवस राहत नसत. असे त्त्यांचे त्यागी व तपस्वी जीवन होते.
प्रत्येकाच्या पुरुषार्थाची काळजी वाहणाऱ्या, प्रत्येकाला भगवंतासोबत जोडून देणाऱ्या, प्रत्येकाला सुख शांती मिळवण्यासाठी ईश्वरीय संदेश देणाऱ्या, सर्वांच्या प्रिय ज्या खरोखर भगवंत प्रिय झाल्या अशा चंदा दीदी यांनी आपला ईहलोकातील प्रवास संपवुन पुढच्या ईश्वरीय कार्यासाठी उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांचा अंत्यविधी सुद्धा ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्यकलापानुसार पंचवटी येथील अमरधाम मध्ये करण्यात आला. चार बालब्रम्हचारी ब्रह्माकुमारांनी त्यांना खांदा व अग्निडाग दिला. सिडको येथील कुमारांनी अतिशय आस्थेने त्यांचा अंत्यविधी पार पाडला. चंदा दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण नाशिक मधीलच नाही तर माउंट अबू येथून सुद्धा काही सदस्य उपस्थित होते. ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदीजीसहित नाशिकच्या सर्व समर्पित भगिनी याप्रसंगी उपस्थित होत्या. चंदादीदींसाठी ब्रह्माकुमारी सदस्य सहित त्यांच्या लौकिक परिवारातील सर्व सदस्य याप्रसंगी उपस्थित होते. चंदादीदींचा हा गोतवाळा म्हणजेच त्यांच्या प्रति प्रेमाची कहाणी सांगणारा ठरतो.
चंदा दीदी यांच्या पुढील आयुष्यास सुख शांती लाभो याच ईश्वरचरणी प्रार्थना….
ओम शांती ओम शांती ओम शांती…..
ब्रह्मकुमार दिलीपभाई, नाशिक
0
2
5
6
2
9