*नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पोलीस आयुक्त यांना निवेदन*
*महिला पत्रकारावर अश्लील भाषा वापरणाऱ्या म्हात्रेवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा-यशवंत पवार*
*नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पोलीस आयुक्त यांना निवेदन*
*नाशिक (प्रतिनिधी)* : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या वार्तांकनासाठी गेलेल्या दैनिक सकाळच्या महिला पत्रकारावर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी अत्यंत अश्लील भाषा वापरल्याने महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक-जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी केली आहे.
आज (दि.२१) नाशिक जिल्हा व तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी श्री.पवार बोलत होते.या भेटीत यशवंत पवार यांनी महिला पत्रकारांच्या सुरक्षेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.
या भेटीत बदलापुरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महिला पत्रकारांना उद्देशून वामन म्हात्रे यांनी “तू अशा बातम्या देत आहेस,भडकावू बातम्या देत आहेस,जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे,” अशी धमकी वजा अत्यंत अश्लील व विनयभंग करणारी भाषा वापरली. या घटनेमुळे राज्यातील पत्रकारांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पत्रकारास धमकी देऊन अश्लील व शिवराळ भाषा वापरल्याने पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या कलमांतर्गत वामन म्हात्रे व महिला भगिनींचा अपमान केल्याबद्दल विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.
यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देण्यात आले.नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष यशवंत पवार, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब बोरगुडे पाटील, जिल्हा सरचिटणीस दिनेश पंत ठोंबरे, तालुकाध्यक्ष करणसिंग बावरी, कार्याध्यक्ष लियाकत पठाण, उपाध्यक्ष पंकज पाटील, सौ. सुनीता पाटील, सरचिटणीस संजय परदेशी, संघटक भैय्यासाहेब कटारे, सहसंघटक जनार्दन गायकवाड, समन्वयक विश्वास लचके, कार्यकारणी सदस्य राकेश पाटील, दिनेश पगारे आणि संतोष शिंदे आदिंसह जिल्हा व शहरातील पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार संघटनांनी म्हात्रे यांच्या अश्लील वर्तनाचा निषेध करत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.