*डेंग्यु नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणांनी* *मोहीम स्तरावर उपाययोजना कराव्यात*
संदर्भ रुग्णालयात डेंग्यु आजारासंदर्भात आढावा बैठक संपन्न*
*नाशिक, दिनांक 20 जुलै, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :* जिल्ह्यात वाढत्या डेंग्यु आजार प्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्व आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने मोहीम स्तरावर उपाययोजना कराव्यात, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिल्या.
संदर्भ रूग्णालय येथे डेंग्यु आजाराबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे. मनपा अतिरीक्त आयुक्त स्मिता झगडे, उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुनीता पीळवदकर, अतिरिक्त जिल्हा शल्याचिकीत्सक डॉ. निलेश पाटील, वैद्यकीय अधिकारी संदर्भ सेवा डॉ.अरुण पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.तानाजी चव्हाण, अतिरीक्त सहसंचालक मलेरिया विभाग डॉ. विवेक खतगावकर यांच्यासह आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले की, जिल्ह्यात डेंग्यु रूग्णसंख्या 474 वर पोहचली असून ही वाढती संख्या लक्षात घेता, यास वेळीच प्रतिबंध व नियंत्रण करणे ही सर्व आरोग्य यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती तात्काळ नष्ट करणे आवश्यक आहे. डेंग्युच्या निदानासाठी प्राथमिक चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या तपासणी किट, औषधे, गोळ्या व इतर आरोग्य सुविधांची कमतरता भासणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच हा औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवावा. शहरासह ग्रामीण पातळीवरही या उपाययोजना राबविण्यात याव्यात. लोकसंख्येच्या घनतेनुसार आवश्यक ठिकाणी सकाळी व सायंकाळी या दोन्ही वेळेत औषध व धुर फवारणी करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.
डेंग्यु आजाराबाबत मोहीम स्तरावर नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी आरोग्य विभागासह शिक्षण विभागानेही ही जबाबदारी पार पाडावयाची आहे. जनजागृतीसाठी फ्लेक्स, स्थानिक केबल वाहिन्यांवरून माहितीपर स्क्रोल, तसेच आकाशवाणीवरून प्रबोधनपर जिंगल्स यांचा वापर प्रभावी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.
डेंग्यु आजाराच्या निर्मूलनासाठी आरोग्य अधिकारी यांनी स्वच्छता कर्मचारी यांच्या मार्फत विशेष ड्राईव्ह राबवावा. यासाठी ॲप तयार करावा. लोकेशन ट्रेस केल्यास कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणी अधिक जबाबदारीने काम करतील. या कामात कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित अधिकारी यांना दिले. त्याचप्रमाणे नाशिक व मालेगाव येथे चाचणी लॅबसाठी आठवडाभरात प्रस्ताव पाठविण्यात यावेत. शहरातील सिडको व नाशिकरोड तसेच ग्रामीण भागात दिंडोरी व निफाड भागात रूग्णसंख्या अधिक असल्याने याठिकाणी स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिल्या. तसेच आवश्यकतेनुसार फवारणीसाठी शेतकऱ्यांना आवाहन केल्यास त्यांच्याकडून फवारणीसाठी मिनी टॅक्टर उपलब्ध होवू शकतील असेही मंत्री दादाजी भुसे यांनी सूचित केले.
यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संदर्भ रूग्णालयातील इतर आरोग्य सेवाविषयक बाबींचाही आढावा घेतला.
00000