ई-पेपरमहाराष्ट्रराजकिय
येवलेकर विकासालाच मत देतील, वचननाम्यातील आश्वासने पूर्ण करण्यावर आमचा भर – छगन भुजबळ
0
4
2
9
5
7
येवला,दि.२५ नोव्हेंबर:– पुढील ३३ वर्षांच्या पाणी पुरवठ्याचा विचार करुन येवला शहराला दररोज पुरेसा आणि शुद्ध पाणी पुरवठा केला जाणार आहे. शहरातील सर्व रस्ते काँक्रिटचे करून बायपास रस्त्याद्वारे वाहतूक कोंडीला आळा घातला जाणार आहे. लातूरच्या धर्तीवर विस्थापित व्यवसायिकांचे पुनर्वसन करून वाणिज्य संकुलातून व्यापार व उद्योगाला चालना दिली जाईल. पैठणी फेस्टिव्हल नाशिक, पुणे आणि मुंबईत भरविण्याचा निर्धार व्यक्त करणारा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, रिपाइं महायुतीचा वचननामा जनतेसमोर सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नुकतीच हृदयशस्त्रक्रीया झाली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घरी उपचार घेत आहेत. येवला शहर आणि मतदारसंघाविषयी असलेल्या तळमळीमुळेच त्यांनी ‘येवला वचननामा’ चे मुंबईत उपचार घेत असलेल्या निवासस्थानातून अनावरण केले. यावेळी येवलेकर विकासालाच मत देतील असा विश्वास व्यक्त करतानाच वचननाम्यातील गोष्टींची पूर्तता करण्यावर आमचा भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत येसगाव पाणी पुरवठा योजना साकारली जात आहे. १६३.४२ कोटी रुपयांच्या या योजनेमुळे येवल्यात दररोज पुरेसा आणि शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे.
स्वच्छ व सुंदर येवल्याचा संकल्प
येवला शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी उघड्या गटारी बंदिस्त करणारी ८२ कोटी रुपयांची शहरी भुयारी गटार योजना टप्पा १ सध्या सुरू आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यात ८६.५१ कोटी रूपयांची योजना आहे. तिची मान्यता अंतिम टप्प्यात असून यामुळे मलनिस्सारण केंद्राची क्षमता १३ दशलक्ष लिटर एवढी होणार आहे. त्याचबरोबर सध्या शहरात १३ घंटागाड्या आहेत. लवकरच ही संख्या दुप्पट करण्यात येईल. घराघरातून कचरा गोळा करून तो बायोमायनिंग प्रकल्पात आणला जाईल. तेथे शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाईल. ४२ हजार ११ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. याशिवाय रुग्णालय आणि औषध दुकानांमधील जैविक घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी भस्मिकरण प्रकल्प उभारण्याचेही प्रस्तावित असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
उद्योग, व्यवसायात वाढ
चिंचोडी औद्योगिक वसाहतीत लवकरच 50 एकर जागेवर कांदा प्रक्रिया उद्योग सुरू होत आहे आणि पीएम मित्रा सिल्क पार्क हा केंद्र सरकारचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. याद्वारे मोठी गुंतवणूक येईल व रोजगारही उपलब्ध होईल. वाणिज्य संकुलात विस्थापीत व्यावसायिकांना लातूर पॅटर्नद्वारे दिलासा दिला जाईल. आणखी वाणिज्य संकुल उभारून व्यवसायाला चालना देण्याचा मनोदय भुजबळ यांनी व्यक्त केला.
पैठणी फेस्टिव्हल
येवला पैठणीचे ब्रँडिंग करतानाच या उद्योगाला भरभराटीला आणण्यासाठी नाशिक, पुणे, मुंबई येथे पैठणी फेस्टिव्हलचे आयोजन केले जाईल. या महोत्सवासाठी देशभरातून पर्यटक, ग्राहकांना आकर्षित केले जाईल. पैठणी साडी, ड्रेससह बहुविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील. दर्जेदार व आकर्षक पैठणी उत्पादने तयार होण्यासाठी विविध सुविधा निर्माण केल्या जातील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
नगरपालिका होणार आधुनिक
पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी नगरपालिका कार्यालय कामकाजाचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येईल. विविध ना हरकत दाखले, नोंदी, जन्म-मृत्यू नोंदी आदी सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातील. मालमत्ता कर, पाणी पट्टी व अन्य कर घरबसल्या नागरिकांना ऑनलाईन भरणे, अर्जाची माहिती घरीच ऑनलाईन पाहणे, मोबाईलवरूनच नगरपालिकेकडे तक्रार करणे, तक्रारींचा निपटाराही त्वरीत व्हावा यासाठी स्वतंत्र प्रणाली सुरु करणे आदी अमूलाग्र कामे केली जातील, असे भुजबळ यांनी सांगितले.
नमो उद्यान साकारणार
शहरातील नागरिकांना एक उत्कृष्ट दर्जाचे मनोरंजन केंद्र निर्माण व्हावे म्हणून नमो उद्यान साकारले जाईल. त्यात लहान मुलांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी चालण्याचे मार्ग, आकर्षक बागा व पाण्याचे फवारे बसविण्यात येतील. दर्जेदार उद्यान, हरित परिसर, विश्रांती व फिरण्यासाठी सुविधा यामुळे उपलब्ध होईल. हरित वातावरण, आरोग्यदायी जीवनशैली व मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने शहरवासियांना मोठा फायदा होईल. निसर्ग, संस्कृती, आरोग्य आणि आधुनिक सुविधा यांचा सुंदर समन्वय असलेले नमो उद्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. एक कोटी रुपयांच्या निधीची त्यासाठी तरतूद करण्यात येईल.
वचननाम्याची ठळक वैशिष्ट्ये
– माजी नगराध्यक्ष कै. केशवराव पटेल मार्केटचा विकास करून याठिकाणी अद्ययावत भाजीपाला मॉल उभारणार
राज्य वस्त्रोद्योग विभागाचे ओळखपत्र मिळालेल्या विणकर बांधवांना उत्सव भत्ता सारख्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देणार
– १२.२९ कोटींच्या निधीतून अत्याधुनिक पैठणी क्लस्टरचे काम प्रगतीपथावर. क्लस्टरमध्ये धाग्यावर प्रक्रियेसाठी डाईंग, वारपिंग, डिझाईन आणि गारमेंट सेंटर आदी सुविधा असणार. ३ हजार कारागीरांना लाभ होणार
– हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी ८ कोटींच्या निधीतून अर्बन हट केंद्र/एक्झिबिशन सेंटर स्थापणार
– येवला शहर बाह्यवळण रस्त्यासह मनमाड-येवला-कोपरगाव चौपदरी काँक्रीट रस्ता
– शहर रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत येवला शहरातील ७९.७० किलोमीटर रस्त्यांचा रस्ते विकास आराखडा तयार करणार
– शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणार
– येवला रेल्वे स्टेशन वरील मालधक्क्याचे विस्तारीकरण करून कोल्ड स्टोरेज व कव्हर गुड शेड उभारणार. मंजूर असलेला खतांचा रॅक पॉइंट कार्यान्वित करणार
– संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
– शहरात ठिकठिकाणी लटकणाऱ्या वीज तारा भूमीगत करणार
– उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि प्रादेशिक चालक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार
– येवला पोस्ट कार्यालयात डाक निर्यात केंद्र सुरू करणार. पैठणी साडीची निर्यात थेट येवल्यातूनच शक्य होणार
– शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये हायमास्ट बसविणार
– गंगा दरवाजा येथील झोपडपट्टीधारकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारणार
– मध्यवर्ती प्रशासकीय संकुल इमारत व सर्व शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणार
– उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर निर्माण करणार.
– येवला येथे महिला व बालरुग्णालय सुरू करणार
– तालुका क्रिडा संकुलाचे नूतनीकरण पूर्ण करून अत्याधुनिक सोयी-सुविधा तसेच दर्जेदार क्रिडा प्रशिक्षण उपलब्ध करून देणार
– येवला शहरात दर्जेदार कुस्ती प्रशिक्षण अकादमी साकारणे.
– शहर विकास आराखड्यात राखीव जागांवर सर्व सुविधायुक्त क्रीडांगण विकसित करणार
– मौलाना आझाद उर्दू घराची उभारणी केली
मुस्लिम समाजातील विणकारांसाठी जरदोषी क्लस्टर.
– अल्पसंख्याक समुदायासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे विशेष उपक्रम राबविणार तसेच, प्रशिक्षणार्थीना व्यवसाय उभारणीसाठी सहाय्य करणार
– नगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या जागेवर आधुनिक वाचनालय (ई लायब्ररी) निर्माण करणार
0
4
2
9
5
7


