रसिकांना घडली अफलातून गीतांची सुरेल सफर…
नाशिक (प्रतिनिधी) सर्वांना गाता आले नाही तरी ऐकण्याचा छंद अनेकांना असतो. काल जुन्या, नव्या अफलातून चित्रपट गीतांची सफर रसिकांना घडली. सुरेल सायंकाळ अनुभवत श्रोत्यांना आनंद व समाधान मिळाले. उत्तरोत्तर मैफल रंगत गेली व श्रोते सुरांनी न्हाऊन निघाले.
अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे ‘ सुहाना सफर भाग – २’ हा हिंदी गीतांचा कार्यक्रम काल रविवारी संध्याकाळी परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला. या मैफलीत अनेक गाण्यांवर रसिक श्रोत्यांनी ताल धरला. वन्स मोअर देत पसंतीची मोहोर उमटवली. चंदन सा बदन…, ड्रीम गर्ल…,तुम आ गये हो…, हवा के साथ साथ…, क्या खूब लगती हो…, जानेमन जानेमन…आणि सुहाना सफर…
या व अश्या विविध २५ गाण्यांना रसिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
नाशिकमधील ६ सुप्रसिद्ध गायिका अर्चना सोनवणे, रोहिणी पांडे, शिल्पा गोसावी, ज्योती कुलकर्णी, मयुरी मुर्डेश्वर, मनुजा रत्नपारखी तसेच ८ सुमधुर गायक मुकेश भारती, प्रशांत चंद्रात्रे, उदय जोशी, संजय गाडे, संदीप कोते, धनंजय भावसार, सुनील गांगुर्डे व शैलेश सोनार यांनी सहभागी होऊन गाणी सादर केली. सुप्रसिध्द निवेदक संतोष फासाटे यांनी खुमासदार निवेदनामध्ये अनेक किस्से सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची संकल्पना अफलातून ग्रुपचे अध्यक्ष हरीष ठक्कर यांची होती. पवन वंजारी यांनी चोख ध्वनीव्यवस्था सांभाळली. पाहुणे गायक वासुदेव वंजारी यांनी ‘मैं कही कवी ना बन जाऊ…’ हे गीत सादर करून वाहवा मिळवली. प्रकाश गोसावी, सुनील भुतडा, उमेश मालवी, संतोष देहुकर, मनोज पळसकर, विलास नीलकंठ, नितीन, महेश व गिरीष ठक्कर, अनिल पोटे, गोविंद चंदे, डी.एम.बोरसे, राजू पवार यांचे सहकार्य लाभले. या विनामूल्य कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन दिले.