एसटीचे कर्मचारी क्रांतिदिनापासून आंदोलनावर
नाशिक / प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्या, या मागणीसाठी एसटी कामगार संयुक्त कृती समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांतिदिनापासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वच कर्मचारी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन हे १९९५ पूर्वी राज्य कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त होते. एसटी महामंडळाच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे एसटीचे कर्मचारी व शासकीय कर्मचारी यांच्या वेतनामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे. सन २०१६ ते २०२० या कालावधीत प्रशासनाकडून करार करण्यात आला नाही. तत्कालीन परिवहन मंत्री यांनी ४८४९ कोटी रुपयांची एकतर्फी वेतनवाढ लागू केली. त्यावेळी सातव्या वेतन आयोगाचे २.५७ सूत्र वापरण्यात आले. संपूर्ण ४८४९ कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांच्या बेतनसाठी वापरण्यात आले नाही. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता जवळपास ३ हजार कोटी रुपयांची रक्कम प्रशासनाकडे शिल्लक राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एसटी कामगारांचे वेतन कमी असल्यामुळे राज्य शासनाने माहे नोव्हेंबर २०२१ पासून ज्या एसटी कामगारांची सेवा १ ते १० वर्ष झाली आहे, त्यांच्या मूळ वेतनात ५ हजार रुपये, ११ ते २० वर्षापर्यंत सेवा झाली असेल अशा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४ हजार रुपये तसेच २० वर्षापेक्षा जास्त सेवा झाली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २५०० रुपयांची वाढ लागू केली. वाढीमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी तफावत निर्माण झाली आहे. ही तफावत दूर करण्यासाठी सरसकट ५ हजार रुपये वाढ दिल्यास सदरची तफावत दूर होईल. तसेच २०२० ते २०२४ हा वेतन कराराचा कालावधी सुद्धा संपुष्टात आलेला असताना त्या कालावधीचा वेतन करार अद्यापही करण्यात आला नाही. ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन एसटी कर्मचाऱ्यांना लागू असलेली पदनिहाय वेतनश्रेणी सन २०१६ पासून लागू करण्यात यावी, त्यासाठी शासनाप्रमाणे १० वर्षांची मुदत मान्य करण्यास कृती समिती तयार आहे. ४८४९ कोटीतील शिल्लक रक्कम व पाच, चार, अडीच हजार रुपयाची दिलेली वाढ याचे समायोजन करण्यास संयुक्त कृती समिती तयार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी कृत्ती समितीसोबत बैठक घेऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन एसटी कामगारांना द्यावे, अन्यथा संयुक्त एसटी कामगार कृती समिती येत्या ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून आगार, विभाग व संपूर्ण राज्यभर आंदोलन तीव्र करेल, अशी माहिती कृती समितीतील महा. एसटी कामगार संघटनेचे वर्धा विभागीय सचिव शम्मी पठाण यांनी दिली.