अनधिकृत होर्डिंग वर कडक निर्बंध
विंचूर ग्रामपालिका ऍक्शन मोडवर

विंचूर येथील ग्रामपालिका प्रशासनाच्या वतीने आजपासून अनधिकृत होर्डिंग विरूध्द मोहीम हाती घेण्यात आली ही मोहीम दि. 27 पर्यंत चालणार आहे. मात्र त्यानंतर कुणी अनधिकृत होर्डिंग्ज लावले तर संबंधितांविरूध्द कारवाई करण्यात येईल अशी माहिती ग्रामपालिका प्रसासनाच्यावतीने देण्यात आली असून ही मोहीम महाराष्ट्रभर सुरू राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच होर्डिंग लावायचे झाल्यास ग्रामपालिकेची रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे.
दि. 13 मे 2024 रोजी मुंबईत वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडला. या पासवसामुळे मुंबईच्या घाटकोपर परिसरात एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आणि यात 14 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 75 पेक्षा अधिक लोक यात जखमी झाले होते. या दुर्घटनेमुळे मुंबईतल्या मोठमोठ्या आणि अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
राज्यातील अनधिकृत जाहिराती फलक, होर्डिंग, पोस्टर्स बाबत उच्च न्यायालयाने नुकतेच कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विंचूर ग्रामपालिका अॅक्शन मोडवर आली आहे. ग्रामपालिकेने शुक्रवार ता.24 ते ता.27 रोजी चार दिवस अनधिकृत लावलेले फलक काढण्याचे तसेच कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. आज शुक्रवार दि. 24 रोजी विंचूर तीनपाटीवरील बस शेड वरील होर्डिंग ग्रामपालिकेच्या वतीने काढण्यात आले असून गावात ठिकठिकाणी लावलेले होर्डिंगही या चार दिवसांत काढण्यात येणार आहे. तसेच फलक लावण्याबाबत फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिकांनाही नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तसेच बाहेरगावच्या नागरिकांकडूनही होर्डिंग लावण्यात येते. यावरही निर्बंध घालण्यासाठी ग्रामसभेत ठराव करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.