आरोग्य व शिक्षण
साथीच्या आजारांविषयी जनजागृती : प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय

0
4
7
6
2
2
नाशिक, दि. ७ जुलै :
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारे संसर्गजन्य आजार, जीवनशैलीशी संबंधित आजार तसेच नागरिकांमध्ये आरोग्याविषयी योग्य जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे “साथीच्या आजारांविषयी जनजागृती : प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय” या विषयावर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी अंतर्गत औषधोपचार तज्ज्ञ (Internal Medicine) व जनरल फिजिशियन डॉ. राकेश पाटील, डॉ. सुशील अंतुर्लीकर, डॉ. परेश अलवाणी, डॉ. राजश्री धोंगडे तसेच छातीरोग तज्ज्ञ (Chest Physician) डॉ. स्वप्नील काकड यांनी नागरिकांना विविध आरोग्यविषयक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
डॉ. राकेश पाटील यांनी पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियाचे वाढते प्रमाण लक्षात घेता घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरणे आणि ताप आल्यास त्वरित तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच सर्पदंश, श्वानदंश, इतर विषारी कीटकांचे दंश आणि विषबाधा झाल्यास कोणतेही घरगुती उपाय किंवा अंधश्रद्धेचा आधार न घेता रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. स्वप्नील काकड यांनी पावसाळ्यात श्वसनमार्गातील संसर्ग, न्यूमोनिया, दमा, सर्दी-खोकला यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. श्वास घेण्यास त्रास, सतत ताप किंवा खोकला यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सुशील अंतुर्लीकर यांनी नियमित आरोग्य तपासणीमुळे अनेक गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊ शकते, असे सांगितले. लॅब रिपोर्टचा चुकीचा अर्थ काढणे किंवा सोशल मीडियावरील माहितीच्या आधारे स्वतःहून औषधे घेणे टाळावे. प्रत्येक अहवाल तज्ज्ञ डॉक्टरांकडून समजून घेणे आवश्यक असून संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे उत्तम आरोग्याचे मूलमंत्र असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. परेश अलवाणी यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. योग्य आहार, नियमित व्यायाम, तणावमुक्त जीवनशैली आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी यांद्वारे हे आजार नियंत्रणात ठेवता येतात. उपचाराबरोबरच प्रतिबंधावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. राजश्री धोंडगे यांनी पावसाळ्यात होणारे व्हायरल आजार, पचनसंस्थेशी संबंधित समस्या आणि दूषित अन्न-पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गांबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रौढांसाठीही लसीकरण तितकेच महत्त्वाचे असून इन्फ्लूएंझा, न्यूमोकोकल, हिपॅटायटीस-बी यांसारख्या लसी गरजेनुसार घेण्याचा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की, “आजच्या काळात उपचारापेक्षा प्रतिबंधाला अधिक महत्त्व आहे. वेळेवर आरोग्य तपासणी, संतुलित जीवनशैली, लसीकरण आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला यामुळे अनेक गंभीर आजार टाळता येऊ शकतात. अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल हे केवळ उपचार करणारे रुग्णालय नसून समाजामध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. नागरिकांनी कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि निरोगी समाज घडविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा.”
पत्रकार परिषदेला विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, हॉस्पिटलचे डॉक्टर आणि अधिकारी उपस्थित होते.
0
4
7
6
2
2



