इमानदार पोलीस अभिनेत्याची 25 लाखाची फसवणूक

मुंबई : क्राइम पेट्रोल शोमध्ये पोलिसाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश नायकोडे यांची २५ लाख रुपयांना फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. नवीन घर घेण्यासाठी त्यांनी डोंबिवली येथील वडिलांचं घर गहाण ठेवलं होतं. मात्र फसवणूक झाल्याने ते हतबल झाले आहेत. काय उरलं आयुष्यात आता? वय वर्ष पन्नास झालं. परत कसं उभं राहायचं? असा उद्विग्न सवाल त्यांनी विचारला.एक व्हिडिओ शेअर करत सतीश नायकोडे म्हणाले, की “घर घेण्याचं स्वप्न बाळगलं होतं, त्यासाठी वडिलांचं डोंबिवलीतलं घर एका प्रायव्हेट फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवलं होतं. ते पैसे मी आस्था प्रॉपर्टीजच्या माध्यमातून घर घेण्यासाठी गुंतवले. तिथे असणारे सच्चिदानंद बामणे, अँग्नल परेरा, आकाश सोनी… सगळ्यांत यांचा मास्टरमाईंड म्हणजे शैलेश काकण. त्याचबरोबर त्यांचे दोन साथीदार म्हणजे अभिषेक गुजर आणि रुपेश बेळमकर. ही सगळी टोळी आहे आणि यांच्यावर नक्कीच कुणाचा तरी वरदहस्त आहे.”नायकोडे पुढे म्हणाले की, “यांनी अनेक कुटुंबांची अशी फसवणूक केलेली आहे, की घर देतो असं सांगून पहिले एक नॉर्मल घर दाखवायचं. नंतर त्याचा व्यवहार होत नाही. एक मोठी रक्कम काढून घ्यायची आणि नंतर SRA चं घर दाखवायचं. साहजिकच चाळीत घर घेणाऱ्या माणसाला SRA चं घर दिसतंय, सोसायटीत दिसतंय, लिफ्ट असलेली बिल्डिंग मिळतेय तर लोक अजून पैसे देऊन पुढे सरसावतात. मग या लोकांनी सरकारी कागदपत्रं, SRA चे लेटरहेड, अधिकारांच्या सह्या, सरकारी शिक्के, स्वतः SRA ऑफिसमध्ये नेऊन केबिनमध्ये बसवून… मग समोर बसलेली व्यक्ती कोण होती, त्यांचं ID कार्ड तर आम्ही नाही मागू शकत ना, की आता SRA च्या बिल्डिंगमध्ये तुम्ही आहात. त्या केबिनमध्ये त्या टेबलवर आहात. समोर बसलेली व्यक्ती कोण आहे, असं कसं विचारणार? तुमचा आयडी दाखवता , असं नाही विचारणार. एवढं सगळं दिसतंय आणि मला वाटतं अशी यांची अजून चार दोन कुटुंब पण यांच्यासोबत असावीत की जे आमच्यासारख्या लोकांना हे भासवायचे की बघा आम्हाला घर मिळालंय. आमचे पेपर तयार झालेत. आमचे पेपर क्लिअर झालेत. आम्हाला अलॉटमेंट मिळतंय.”


