
0
3
2
1
2
3
यंदाची उन्हाळ्याची सुट्टी असणार कुल !
१६ मे रोजी प्रदर्शित होणार ‘एप्रिल मे ९९’
सध्या उकाडा प्रचंड वाढलेला असतानाच हा उकाडा सुसह्य करण्यासाठी ‘एप्रिल मे ९९’चा मस्तीने भरलेला चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कृष्णा, प्रसाद, सिद्धेश आणि जाईची धमाल मस्ती यात दिसत असून प्रत्येकाला आपल्या सुट्टीची आठवण करून देणारा हा जबरदस्त चित्रपट आहे.
आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या दुनियेत सुट्ट्यांचा आनंद स्क्रीनवरच मर्यादित राहिला आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा ना स्मार्टफोन्स होते, ना वायफाय, तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद गावाला जाऊन गावभर हुंदडण्यात, नदी, समुद्रावर फेरफटका मारण्यात, सायकलवरून फिरण्यात, सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपण्यात आणि बर्फाचे गोळे खाऊन लुटला जायचा. अशीच मजामस्ती ‘एप्रिल मे ९९’ मध्ये पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये, गाण्यांमध्ये कृष्णा, प्रसाद, सिद्धेश ही खोडकर मुलं आणि त्यांच्या जोडीला समंजस जाई सुट्टीचा मनमुराद आनंद दिसत असून मोठ्यांना नॉस्टॅलजिक करणारा आणि तरुणाईला खऱ्या सुट्टीची व्याख्या सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटातील ‘ताकुंबा’ हे गाणेही सध्या प्रचंड गाजतेय. धमाल, मस्ती आणि एनर्जीने भरलेले हे गाणे रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केले असून त्यांचाच जबरदस्त आवाज या गाण्याला लाभला आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे शब्द दिग्दर्शक रोहन मापुस्कर व गीतकार प्रशांत मडूपवार यांनी लिहिले आहेत. सगळ्यांना थिरकायला लावणाऱ्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन स्टॅनली डिकॉस्टा यांनी केले आहे. तर ‘समर हॉलिडे’ हे गाणे भूमी प्रधान, रोहन गोखले, रोहन प्रधान यांनी गायले असून रोहन – रोहन यांचे संगीत लाभलेल्या हा धमाल गाण्याला प्रशांत मडपुवार, रोहन गोखले यांनी शब्दबद्ध केले आहे.
दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून प्रेक्षकांना जुन्या आठवणींची सफर घडेल. परीक्षा संपल्यानंतरचा सुट्टीचा काळ हा पूर्णपणे आनंददायी असतो. शाळा, अभ्यास यांच्यातून सुटका झाली असल्याने फक्त मजा करण्याचा हा काळ असतो. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात हा क्षण नक्कीच अनुभवला असेल. या चित्रपटातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा याच अनुभवाची सफर घडेल.”
निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांची मैत्री व खट्याळपणा पाहून प्रेक्षकांना त्यांच्या मित्रांची आठवण होईल. आजकालच्या सिमेंटच्या जंगलात, टेक्नोलॉजिकल दुनियेत खऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद काय असतो, हे लोक विसरले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीचा खरा आनंद, मजा, धमाल या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.”
मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. यात आर्यन मेंगजी (कृष्णा), श्रेयस थोरात (प्रसाद) आणि मंथन काणेकर (सिद्धेश) आणि साजिरी जोशी (जाई) यांच्या भूमिका आहेत. येत्या मे महिन्याच्या सुट्टीत म्हणजेच १६ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
0
3
2
1
2
3