ब्रेकिंग
लासलगावला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

0
4
7
2
1
3
लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांमध्ये वाद; लिलाव काही काळ ठप्प, शेतकऱ्यांचा रास्ता रोको
किरण कुमार आवारे…
शिरवाडे वाकद :- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुसार मालाच्या लिलावावेळी नवीन व्यापाऱ्यांच्या प्रवेशामुळे जुन्या व नवीन व्यापाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. या वादामुळे जुन्या व्यापाऱ्यांनी लिलावातून माघार घेतल्याने काही काळ लिलाव बंद पडला. परिणामी सकाळपासून धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचे हाल झाले.
लिलाव ठप्प झाल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी कोटमगाव त्रिफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. जुन्या व नवीन व्यापाऱ्यांच्या खरेदी दरात क्विंटलमागे सुमारे ४०० रुपयांचा फरक असल्याने नवीन व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी करून घ्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. नवीन व्यापारी गेल्या सात वर्षांपासून पोट खरेदीदार म्हणून कार्यरत होते. संबंधित व्यापारी आडतदारामार्फत खरेदी करत होते. मात्र, वर्षभरापूर्वी त्यांनी बाजार समितीच्या नियमांना अधीन राहून अधिकृत आडती म्हणून परवाना घेतला आहे. त्यानंतर ते आडते आज लिलावात उतरताच त्यांनी सोयाबीनला जुन्या व्यापाऱ्यांपेक्षा तब्बल चारशे रुपये वाढीव भाव दिला. नवीन व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे ३३ नग खरेदी केले. मात्र, नवीन व्यापाऱ्यांनी प्रति क्विंटल ४०० रुपये अधिक दर दिल्याने जुन्या व्यापाऱ्यांनी लिलाव थांबवला. नवीन व्यापारी प्रामुख्याने सोयाबीन व मका खरेदी करत असल्याने हरभरा व गहू या इतर धान्यांचे सुमारे ११० ट्रॅक्टर माल खरेदीपासून प्रलंबित राहिला. सोयाबीन व मक्याबरोबर इतर धान्य नवीन व्यापारी खरेदी करत असतील तर नवीन व्यापाऱ्यांनी खरेदी करण्याबाबत आमची काही हरकत नसल्याचे जुन्या व्यापाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र, त्या मालाची खरेदी करण्यास कोणी पुढे न आल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. त्यानंतर घटनास्थळी लासलगावचे सहा.पो.नि.दिपक पाटील हे फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. बाजार समिती उपसभापती ललित दरेकर यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. दरम्यान, बाजार समितीने तातडीची बैठक घेऊन नवीन व्यापाऱ्यांना तात्पुरते खरेदीपासून रोखले. त्यानंतर लिलाव पुन्हा सुरळीत करण्यात आला. या घटनेमुळे बाजारात व्यापाऱ्यांचे दोन गट पडल्याचे दिसून आले.
दरम्यान, नवीन व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या अटींना अधीन राहून परवाना घेतला आहे, त्यामुळे नवीन व्यापाऱ्यांना खरेदी पासून आम्हाला रोखता येणार नाही. त्यामुळे याबाबत निर्णय घ्यावा, यासाठी उद्या जुन्या व्यापाऱ्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी दिली.
0
4
7
2
1
3



