येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी
अकरा अपक्ष उमेदवार देखील आपले नशीब आजमावणार
येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी तब्बल 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असता आज सोमवार दि. चार नोव्हेंबर रोजी अनेकांच्या माघारी झाल्यामुळे तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. बहुचर्चित अपक्ष उमेदवार कुणाल नरेंद्र दराडे यांचीही आज माघार झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) या दोन्ही पक्षात सरळ लढत होत असून अकरा अपक्ष उमेदवार देखील आपले नशीब आजमावणार आहेत.
येवला लासलगाव मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केलेले छगन भुजबळ हे पाचव्यांदा उमेदवारी करीत आहेत. त्यांनी चार वेळा या मतदारसंघात निवडून येऊन उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असे विविध मंत्रीपद भूषविले आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झालेले होते. त्यावेळी त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी करत असलेले माणिकराव शिंदे यांचा पराभव केलेला होता. यावेळीही ऍड. माणिकराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) तथा आघाडी पक्षाकडून उमेदवारी करीत आहेत. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे महायुतीकडून ऍड माणिकराव शिंदे हे आघाडी कडून निवडणूक लढवीत असल्याने दोन अधिकृत पक्षाकडून दोन्ही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. तसेच अनेक सामाजिक कार्य करत असताना आपल्या कामाची पावती मिळावी यासाठी तब्बल 11 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटाचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन आघाडी धर्म पाळायचा ठरवत माणिकराव शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिंदे यांना चांगले बळ मिळाले असल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांचे अपक्ष उमेदवार सचिन आहेर यांचीही आज माघार झाली आहे.