Breaking
ब्रेकिंग

विसापूर आश्रम शाळेतील मुलीचा मृत्यूने तालुक्यात संतापाची लाट

0 4 9 3 1 0

*आश्रमशाळांचा सावळा गोंधळ आणि यंत्रणेची असंवेदनशीलता:  ८ वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूने पुन्हा उघड केले प्रशासकीय धोरण*

दिपक बागुल, कळवण…

नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय आश्रमशाळेत घडलेली घटना म्हणजे केवळ एक अपघात नसून, आदिवासी विकास विभागाच्या ढिसाळ कारभाराचा आणि प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस आहे.

८ वर्षीय सृष्टी सूर्यवंशी या चिमुकलीचा उपचारातील अवाजवी विलंब आणि यंत्रणेच्या दिरंगाईमुळे झालेला मृत्यू अत्यंत संतापजनक असून, यामुळे शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा बोजवारा उघडा पडला आहे.

सृष्टीला दिवसभर ताप आणि उलट्यांचा तीव्र त्रास होत असतानाही वसतिगृह व शाळा प्रशासनाने ना पालकांना अंधारात ठेवले, ना वेळेवर वैद्यकीय साहाय्य उपलब्ध करून दिले.

प्रकृती अतिशय चिंताजनक झाल्यावर रात्री दीड वाजता पालकांना दूरध्वनी करून संपर्क साधण्यात आला. त्यानंतर आजारी बालिकेला इकडेतिकडे फिरवून उपचाराच्या नावाखाली केवळ औपचारिकता पूर्ण केली गेली.

३ सप्टेंबरला मोकभणगी आणि पुन्हा आश्रमशाळा असा प्रवास केल्यानंतर ४ सप्टेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजता कळवणला हलविणे, हा प्रकार वैद्यकीय उपचारांमधील भयानक अनास्था दर्शवतो. पहाटे २:२७ वाजता डॉक्टरांनी मृत घोषित करेपर्यंत यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत होती.

शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचे प्रकार नवीन नाहीत. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे निकृष्ट जेवण, पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची दुर्दैवी वानवा आणि त्याहून गंभीर म्हणजे नियमित आरोग्य तपासणीचा संपूर्ण अभाव, यामुळे लहान बालकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी आणि सुरक्षेच्या आशेने या शाळांमध्ये पाठवले असताना, प्रशासनाची ही उदासीनता म्हणजे एक प्रकारे शासकीय यंत्रणेकडून होणारी विद्यार्थ्यांची हेळसांडच आहे.

सृष्टीच्या मृत्यूस कारणीभूत असणारे मुख्याध्यापक, संबंधित वॉर्डन आणि कर्तव्यात कसूर करणारे सर्व वैद्यकीय कर्मचारी यांच्यावर तत्काळ निलंबनाची आणि सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची कारवाई झाली पाहिजे.

केवळ शवविच्छेदन अहवालावर मदार न ठेवता, या संपूर्ण प्रकरणाची सखोल न्यायिक किंवा उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे समोर आणली जावीत.

जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करून आपत्कालीन वैद्यकीय उपचारांची नियमावली सक्तीची करावी.

या निष्पाप चिमुकलीचा गेलेला जीव परत येणार नाही, परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि झोपलेल्या आदिवासी विकास यंत्रणेला खडबडून जागे करण्यासाठी आता कठोर पावले उचलणे अनिवार्य ठरले आहे. प्रशासनाने या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्याचा इशारा संतप्त पालकांनी दिला आहे.

*”आमच्या लेकरांच्या जीवाशी खेळणे बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा वणवा पेटेल!”*

कळवण तालुक्यातील विसापूर शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या दुर्घटनेने आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आणि संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे. ८ वर्षीय सृष्टी सूर्यवंशी हिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर संतप्त पालकांनी शासकीय यंत्रणेच्या या अमानुष आणि बेजबाबदार कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पालकांच्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले:

“आम्ही आमच्या मुलांना शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या आशेने आश्रमशाळेत पाठवतो, पण प्रशासनाने त्यांना सुरक्षित ठेवण्याऐवजी अक्षरशः मृत्यूच्या दाढेत ढकलले आहे. दिवसभर आमची मुलगी तापाने फणफणत होती, उलट्या होत होत्या, तरीही शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि वॉर्डनने आम्हाला साधी कल्पना देण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. रात्री दीड वाजता फोन करून जेव्हा आम्हाला बोलावण्यात आले, तेव्हा आमच्या लेकराची प्रकृती अंतिम घटका मोजत होती. उपचाराच्या नावाखाली केवळ दवाखान्यांचे उंबरठे झिजवत वेळ घालवण्यात आला. जर वेळीच योग्य उपचार मिळाले असते, तर आज आमची सृष्टी आमच्यात असती. हा साधा अपघात नसून प्रशासकीय यंत्रणेकडून झालेला खूनच आहे.” शासकीय यंत्रणेच्या दिरंगाईवर रोष व्यक्त करत पालकांनी थेट इशारा दिला आहे की, जर या प्रकरणी दोषी असणाऱ्या मुख्याध्यापक, वॉर्डन आणि संबंधित वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर तत्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले नाही, तर आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारले जाईल. निष्पाप बालकांच्या जीवाशी चाललेला हा खेळ आता सहन केला जाणार नाही..

*ओमकार सूर्यवंशी मयताचे वडील*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 3 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे