
0
4
2
9
5
7
विंचूरला जि.प. शाळेच्या जागेसाठी ग्रामस्थांचे आंदोलन,
नाशिक छत्रपती संभाजी महामार्ग दोन तास ठप्प
विंचूर : जिल्हा परिषद शाळेची जागा खाजगी व्यक्तीने खरेदी केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान सरपंच सचिन दरेकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त विंचूरकर ग्रामस्थ आणि जि. प शाळेच्या मुलांनी नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग सुमारे दोन तास रोखून धरला. संबंधित व्यक्ती सह खरेदीखत बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी संतप्त ग्रामस्थांनी केली. निवासी नायब तहसीलदारांनी सदर सातबारा उतारा रद्द करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती.सुमारे सात ते आठ किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

येथील तीन पाटी भागात जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत आहे. याचा गट नंबर ६२७ चे खरेदीखत मधुकर रामचंद्र गायकर निमगाव वाकडा यांनी खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली असता ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. खरेदीखताची नोंद ७/१२ उताऱ्यावर होऊ नये, यासाठी आंदोलन झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी संताप व्यक्त करीत लोकांना शाळेसह मंदिराच्या जागा कमी पडत असल्याची खंत व्यक्त करीत अशा लोकांना ग्रामस्थांनी धडा शिकवला पाहिजे असे मत व्यक्त केले. तर माजी उपसभापती संजय शेवाळे यांनी अशा लोकांना विंचूरमध्ये पाय ठेवु देऊ नका.असे आवाहन केले.तर कैलास सोनवणे,विलास गोरे, किशोर पाटील, किशोर जेऊघाले आदींनी आपल्या मनोगतातून ही केवळ शाळेची जागा नसून, आपल्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क आणि उज्ज्वल भविष्याशी निगडीत असलेला अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे.गावाच्या विकासाबरोबरच शिक्षणाचे पवित्र स्थान अबाधित राहणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याची भावना व्यक्त केल्या. आंदोलकांनी तहसीलदार आंदोलन स्थळी आल्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊ अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी पोलीस प्रशासनाने संतप्त ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आंदोलन बराच वेळ चालले. अखेर निवासी नायब तहसीलदार राहुल मुळीक यांनी घटनास्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शाळेतील मुलांनी शाळा आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी सरपंच सचिन दरेकर यांसह जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी सदस्य ज्ञानेश्वर पवार, निफाड पं.स.चे माजी सभापती कैलास सोनवणे, राजाराम दरेकर, विलास गोरे, संजय शेवाळे, पांडुरंग राऊत, किशोर जेऊघाले, विजय दरेकर, सुनिल दरेकर, ज्ञानेश्वर दरेकर, सोपान दरेकर, इस्माईल मोमीन, निलेश चव्हाण, निलेश सालकाडे, फिरोज मोमीन, प्रविण सालगुडे, किशोर जेऊघाले, दत्तात्रय व्यवहारे, राजेंद्र मोरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.

1) शाळेची जागा गावठाण भागात असून सिटीसर्वे ला शाळेची नोंद आहे. सदर सातबारा हा त्याचवेळी रद्द झाला पाहिजे होता.परंतु तसे न झाल्याने ही बेकायदेशीर रित्या खरेदी झालेली आहे.ही केवळ शाळेची जमीन नसून गावातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क आणि उज्ज्वल भविष्याशी निगडीत असलेला अत्यंत संवेदनशील प्रश्न आहे.सदर बेकायदेशीर सातबारा रद्द न झाल्यास या पेक्षाही मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल. – सचिन दरेकर सरपंच विंचूर
2) सदर जागेची मी रीतसर मूळ मालकांकडून खरेदी केली आहे माझ्यासारखीच इतरांनीही तेथे काही जागा खरेदी केली आहे. दहा गुंठे मी खरेदी केली परंतु या भागात इतरही दुकाने चालू आहेत ती पण खाली करण्यात यावी आणि नियम सर्वांनाच लावण्यात यावा.- मधुकर गायकर, खरेदी घेणारे
3) मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. दुसऱ्या व्यक्तीने पण या जागेतील काही भाग खरेदी केला होता त्यांनी पण जागेवर दावा केला होता त्याचा न्यायालयाचा निकाल शाळेकडून नुकताच लागला. आता हे दुसरे प्रकरण असून आज विद्यार्थी रस्त्यावर बसले होते. – सुनीता कदम मुख्याध्यापिका जि प शाळा विंचूर.
4) खरेदी निदर्शनास आल्यानंतर सरपंचांना माहिती देऊन ग्रामस्थां सह विद्यार्थी व ग्रामस्थांनी आंदोलन केले. – सुनील दरेकर, पालक तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष.
आंदोलन सुमारे दोन तास चालू असल्याने यावेळी एक ॲम्बुलन्स येवल्याकडे जात होते ॲम्बुलन्स गर्दीत अडकल्याने आंदोलनकर्त्यांनी त्या ॲम्बुलन्सला रस्ता मोकळा करून देत येवल्याकडे मार्गस्थ केले.
-याबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी यांची दखल घेवून तात्काळ जिल्हाधिकारी,प्रांत अधिकारी शशिकांत मगरुळे यांच्या शी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून नोंद न करता सातबारा उतारा बंद करण्याचे आदेश दिले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
0
4
2
9
5
7


