शरीर सुदृढ व बळकटीसाठी योग अत्यावश्यक – योगशिक्षक अशोक पाटील
महिरावणी येथील मातोश्री गी.दे. पाटील विद्यालयात योग प्रात्यक्षिके
नाशिक: प्रतिनिधी
उत्तम आरोग्य असणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. निरोगी आरोग्यासाठी सर्वांनी योगाभ्यास दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवत आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसेच शरीर बळकट आणि सुदृढ ठेवण्यासाठी नियमित योगा करणे अत्यावश्यक आहे. चांगल्या निरोगी जीवनासाठी दररोज योगासने प्राणायाम करावे असे प्रतिपादन योग शिक्षक अशोक पाटील यांनी केले.
महिरावणी येथील मातोश्री गिताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा प्रात्यक्षिके घेत असताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून त्यांच्या समवेत योगशिक्षिका सौ.जया अशोक पाटील या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे होते.
यावेळी योगशिक्षक अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी योगासने, प्राणायाम व त्यांचे प्रकार,योगसाधना, शुद्धिक्रिया प्रात्यक्षिकांद्वारे करून दाखवत विद्यार्थ्यांकडून विविध योगासने, प्राणायाम करून घेतले.यावेळी योगशिक्षिका जया पाटील यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व,योगासनांमुळे होणारे विविध फायदे, प्राणायामामुळे एकाग्रता, निरोगी आयुष्य कसे प्राप्त होते? याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांनी अध्यक्षीय भाषणात बदलत्या जीवनशैलीत योगासनांचा सराव केल्याने ताण-तणाव दूर होत योगाभ्यासाने भावनिक, मानसिक, शारिरीक, बौद्धिक विकास साधता येतो,असे सांगितले.
प्रारंभी विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक करत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाभ्यास, योगाचे फायदे व मानवी जीवनातील योगाचे महत्त्व सविस्तर मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय पवार, देवेंद्र देवरे, संजय गायकवाड, सुरेखा भामरे, अश्विनी चौरे, दिपाली वाडीले, खंडू लांबे, दिलीप खांडबहाले, विलास येवले यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी केले. आभार उपशिक्षिका सुरेखा भामरे यांनी मानले.