राजयोग हा सर्वोत्कृष्ट योग :- राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी
म्हसरूळ येथील ब्रह्माकुमारी केंद्रावर जागतिक योग दिन साजरा
नाशिक:प्रतिनिधी
योगाचा आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे.योगाचा अर्थ जोडणे असून योगाद्वारे आपण शरीर निरोगी आणि मन निरोगी ठेवू शकतो.योगाद्वारे आपण आत्म्याला ईश्वराशी जोडू शकतो.सर्व योगांपैकी सर्वोत्कृष्ट योग हा राजयोग आहे. जो केवळ मनुष्याला शिकवता येत नाही. हा योग फक्त भगवंतच शिकवतो,जो शिकून मनुष्याला देवत्वाचा दर्जा प्राप्त करतो असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या नाशिक जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांनी केले.
म्हसरूळ येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या “प्रभू प्रासाद” येथे जागतिक योग दिनानिमित्त त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ राजयोग शिक्षिका राजयोगिनी ब्रह्माकुमारी पूनम दीदी या उपस्थित होत्या.
पुढे बोलताना ब्रह्माकुमारी वासंती दीदी म्हणाल्या की, राजयोगाच्या अभ्यासाने शारीरिक व मानसिक रोग दूर होतात. शारीरिक अवयव थंड आणि शांत होतात. भगवंताची प्राप्ती करून मनुष्याला स्वर्गीय सुख प्राप्त होते. येथे योग संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी आहे.राजयोग व हठयोगतील फरक सांगत सर्वांना जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी आयुष्यामध्ये राजयोगाचे अनन्य साधारण महत्व विशद करत आपल्या आणि मानवतेच्या सुखी भविष्यासाठी, आपल्या जीवनशैलीत राजयोगाचा अंगीकार करा आणि सशक्त आणि सुवर्ण भारताच्या नव्या उभारणीत आपले अमूल्य योगदान द्या, हा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व आत्म्यांना ईश्वराचा आंतरराष्ट्रीय योग दिनाचा संदेश दिला.यावेळी उपस्थितांकडून राजयोग ध्यानाचा सराव करून घेण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष,महिरावणी येथील मातोश्री गी.दे.पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब दादा सोनवणे सर यांनी जागतिक योग दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.यावेळी ब्रह्माकुमारी साधक बंधू-भगिनी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.