सामाजिक
मुंबईतील यशस्वी प्रयोगांनंतर; ‘पाण्याने पेटला वणवा’ नाटकाचा महाराष्ट्र दौरा

0
4
7
9
8
2
मुंबईतील यशस्वी प्रयोगांनंतर; ‘पाण्याने पेटला वणवा’ नाटकाचा महाराष्ट्र दौरा
मुंबईतील यशस्वी प्रयोगांनंतर युगंधर क्रिएशन्स एल.एल.पी. प्रस्तुत ‘पाण्याने पेटला वणवा’ हे ऐतिहासिक मराठी नाटक आता महाराष्ट्राच्या दौऱयावर निघाले आहे. ३ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, बीड, औरंगाबाद आणि अहिल्यानगर येथे या नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या शतकोत्तर प्रवासाला अभिवादन करणारे हे नाटक सामाजिक न्याय, समानता आणि स्वाभिमानाच्या लढ्याची प्रेरणादायी कथा रंगभूमीवर जिवंत करते. २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याचा अधिकार मिळविण्याचा संघर्ष नव्हता, तर मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक समतेसाठी उभारलेली ऐतिहासिक चळवळ होती. त्याच संघर्षाची प्रभावी मांडणी या नाटकातून करण्यात आली आहे.
३ ऑगस्ट रोजी नाशिक येथील प्रयोगानंतर या नाटकाचा महाराष्ट्रभर दौरा रंगणार आहे. त्यानुसार ४ ऑगस्ट रोजी धुळे, ५ ऑगस्ट रोजी नंदुरबार, ६ ऑगस्ट रोजी जळगाव, ७ ऑगस्ट रोजी बुलढाणा, ८ ऑगस्ट रोजी जालना, ९ ऑगस्ट रोजी परभणी, १० ऑगस्ट रोजी बीड, ११ ऑगस्ट रोजी औरंगाबाद आणि १२ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.
या नाटकाचे लेखन आणि गीतरचना आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली असून, दिग्दर्शन प्रशांत निगडे यांचे आहे. दोन वेगवेगळ्या कालखंडांचा संगम हे या नाटकाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. इतिहास आणि वर्तमान यांना जोडत शंभर वर्षांपूर्वीच्या संघर्षाचा आजच्या समाजाशी असलेला संबंध नाटक प्रभावीपणे अधोरेखित करते.
शारदा राजकुमार बडोले निर्मित आणि गणेश कृ. मोडक सहनिर्मित या नाटकाला मंदार देशपांडे यांचे संगीत लाभले आहे. वेशभूषा सुप्रिया बर्वे, रंगभूषा मिलिंद कोचरेकर, तर नेपथ्य सुशील पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साकारले आहे.
नाटकात सशांक पांचाळ, मयुरेश मढवी, मयुरी निकम, तेजस राजे, राजू भिलारे, अजित रांजणे, दत्ता शेट्ये, अमोल जाधव, सुबोध हर्डीकर, सायली नंदा, मृणालिनी, महादेव जाधव, मृणाल खिस्मतराव, प्रेम जेटीथोर आणि हे कलाकार विविध भूमिका साकारत आहेत.
मुंबईत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रभरातील रसिकांनाही सामाजिक परिवर्तनाचा प्रेरणादायी इतिहास रंगभूमीवर अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
0
4
7
9
8
2



