- विंचूर ता.०८
येथील एसबीआय बँकेत एका शेतकरी दाम्पत्याने शेतीकामासाठी खात्यातून काढलेले पैसे मोजत असताना पैसे मोजण्यासाठी मदत करतो असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने त्यांचे लक्ष विचलित करून तेहतीस हजार लांबवल्याची घटना विंचूर नुकतीच घडली. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,शेती कामासाठी पैसे लागत असल्याने सोनेवाडी बुद्रुक येथील सुरेश पाटीलबा पडोळ हे बुधवारी ता.०५ दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान विंचूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या शाखेत त्यांच्या पत्नी सोबत पैसे काढण्यासाठी आले. त्यानंतर पडोळ यांनी त्यांच्या पत्नीच्या खात्यातून दीड लाख रुपये काढून मोजत होते त्यावेळी तेथे ३५-४० वयाचा एक अनोळखी तरुण आला. त्याने पडोळ यांना सांगितले की, तुम्ही काढलेल्या पैशांमध्ये काही नोटांचे नंबर चुकीचे आहेत तसेच नोटांचे बंडल खराब आहे. मी तुम्हांला पैसे मोजण्यासाठी मदत करतो, असे सांगितले. त्यानंतर त्या तरुणाने नोटांच्या बंडल मधील काही नोटा पडोळ यांना बँकेतून बदलून आणायला सांगितल्या त्यादरम्यान तरूणाने (चोरट्याने) दीड लाखापैकी ३३ हजार रुपये त्यातून काढून घेतले व तिथून पळ काढला. हा सगळा प्रकार पडोळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, हवालदार सागर आरोटे, घुमरे, सांगळे करीत आहेत.