‘नमो रमो नवरात्री’ उत्सवामुळे डोंबिवलीत उत्साहाचे वातावरण
नाशिक – सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवलीची कीर्ती सर्वत्र आहेच. पण गेली काही वर्ष मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून ‘नमो रमो नवरात्री’ या नावाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सवही डोंबिवलीतच साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नमो रमो नवरात्री’चे आयोजन ३ ते १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सावळाराम महाराज क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले आहे.
या नवरात्री उत्सवात कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महाराष्ट्रातील गरबा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने पारंपारिक वेशभूषेत उत्साहात सहभागी होत आहेत. यंदा या उत्सवात गरबा क्वीन गीताबेन रबारी आपल्या सुरांनी दररोज रंगत आणत आहेत. सोबत ख्यातनाम गरबा गायक निलेश गढवी आणि केतन पटेल यांची देखील त्यांना साथ लाभत आहे.
३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत तारक मेहता फेम दिलीप जोशी, अभिनेते जितेंद्र जोशी, गश्मीर महाजनी, मनजोत सिंग, यश सोनी, मल्हार ठाकर, करण टॅकर, आशिष गुलाटी आणि अभिनेत्री सई मांजरेकर, उर्मिला कानेटकर, श्रद्धा डांगर, रिधिमा पंडित व आर्या जाधव आदी मराठी-हिंदी-गुजराथी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री यांचा मोठ्या प्रमाणात उत्साहाने सहभागी झाले आहेत.
सालाबादप्रमाणे या वर्षीही सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक संजय धबडे ह्यांनी भव्य सेट उभारला आहे. यावर्षी पूर्ण वातानुकूलित ७० हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये स्वस्तिक इव्हेंट्सचे अनिल पासड ह्यांनी १३५ फूट बाय ५०० फूट अशा भव्य एसी डोमची निर्मिती केली आहे. टीटू कुलकर्णी ह्यांचा जबरदस्त साऊंड लाभला आहे. अंबा मातेचे पूजन आणि आरती करण्यासाठी २४*२४ आकाराचे अंबा माता मंदिर उभारण्यात आले असून या मंदिरात सुप्रसिद्ध पुष्प रचनाकार श्याम भगत हे दररोज नवरात्रीच्या नवरंगांनुसार ताज्या फुलांची सजावट करत आहेत.
गरबा प्रेमींना सुरक्षित, निरोगी आणि आनंदी वातावरणात गरब्याचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष देण्यात आले आहे. म्हणूनच एसी टॉयलेट्स, गरबा प्रेमींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि बाऊन्सर्सची प्रायव्हेट सिक्युरिटी या बरोबरच फूड कोर्ट, पार्किंग, सेल्फी पॉईंट्स अशी उत्तम व्यवस्था केली आहे. पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या पर्यावरण पूरक कचरा पेट्या बसविण्यात आल्या असून “जलचर जीवन वाचवा” (सेव्ह ॲक्वा लाईफ) ही संकल्पना त्यातून मांडली आहे. संपूर्ण डोंबिवली परिसरात नमो रमो गरबामुळे एक अनोखी ऊर्जा वातावरणात निर्माण झाली आहे. , अशी माहिती आमदार व मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.