Breaking
ब्रेकिंग

रिसॉर्टमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर महिलेच्या खुनामध्ये

0 4 8 5 2 0

नाशिकमध्ये अपघाताचा बनाव उघड; प्रेमसंबंधातून ३४ वर्षीय महिलेचा खून

नाशिक : वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथे एका रिसॉर्टबाहेर ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात वाटत होती. मात्र पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून प्रेमसंबंधातून झालेला घातपात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

मृत महिलेचे नाव रुपाली नीलेश पाटील (वय ३४, रा. अंबड, नाशिक) असे आहे. मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास रुपाली या एका पुरुषासोबत सांजेगाव येथील रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेल्या होत्या.

जेवण झाल्यानंतर दोघे रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना रुपाली यांना कारची धडक बसली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र घटनेची परिस्थिती संशयास्पद आढळल्याने वाडीवऱ्हे पोलिसांनी तपासाला वेग दिला.

पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. दीपक शिवाजी सैंदाणे (वय ४३) याचे रुपाली यांच्यासोबत मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रिसॉर्टमध्ये असताना दोघांमध्ये काही कारणावरून वाद आणि झटापट झाली. त्यानंतर रुपाली कारमधून उतरून रिसॉर्टच्या गेटबाहेर जात असताना, संतापलेल्या दीपकने कार पाठीमागे वेगाने नेत रुपाली यांना जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे. या घटनेत रुपाली यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न झाल्याचा पोलिसांचा संशय असून, तपासात सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाडीवऱ्हे पोलीस करत आहेत. See less

5/5 - (1 vote)

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे