ब्रेकिंग
विंचूर येथे ट्रॅक्टर-कारची भीषण धडक; चार जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

0
4
2
9
5
7
नाशिक–संभाजीनगर महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. याच महामार्गावर सोमवारी विंचूर येथे दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास पुन्हा एक गंभीर अपघात घडला. ट्रॅक्टर आणि कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा कार (MH 15 FT 9141) आणि ट्रॅक्टर (MH 15 AM 1429) यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. अपघात इतका भीषण होता की इर्टिगा कारचा पुढील भाग पूर्णतः चुरगळला गेला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिककडे हलविण्यात आल्याचे समजते.
रस्त्याचे काम सुरू असताना अपुरी वाहतूक व्यवस्था, दिशादर्शक फलकांचा अभाव, अंधारात दिसत नसलेले अडथळे आणि अचानक वळणे यामुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही अनेकदा तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा संताप व्यक्त केला आहे.
0
4
2
9
5
7


