
0
3
2
1
2
3
गेल्या पिढीतील गायक,अभिनेता किशोरकुमार यांची लोकप्रियता आजही ओसरलेली नाही. आजच्या युवकांनाही त्यांची गाणी आवडतात. अश्या हरहुन्नरी कलाकाराच्या ‘लेजंड किशोरदा फॅन्स फाउंडेशन’ चा उद्घाटन सोहळा रविवारी ( दि. ११) नाशिकमध्ये होत आहे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या विनामूल्य उपक्रमात नाशिकमधील लोकप्रिय गायक कलाकार संगीत रजनी सादर करणार आहेत. अशी माहिती हर्षद शिंत्रे व प्रशांत चंद्रात्रे यांनी दिली.
पुण्यातील ज्येष्ठ कलाकार,संगीत संयोजक विवेक परांजपे यांच्या हस्ते लेजंड किशोरदा फॅन्स क्लबच्या लोगोचे अनावरण करण्यात येईल. त्यांनी १५० देशांमध्ये किशोरकुमार यांच्या समवेत संगीताचे कार्यक्रम केले आहेत. ते उत्कृष्ट कीबोर्ड वादक असून मंगेशकर परिवाराचे विश्वासू साथीदार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील ज्येष्ठ तबलावादक अजय जोशी उपस्थित राहणार आहेत. अनेक दिग्गज गायक कलाकारांना ते साथसंगत करतात. निनाद कलाकेंद्राच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरातील असंख्य कलाकारांना एका छताखाली एकत्र आणले आहे. तसेच प्रख्यात शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद शिंदे, माजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आयुक्त हरीश बैजल आणि जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे अध्यक्ष उमेश गायकवाड उपस्थित राहणार आहेत.
सर्व नाशिककर रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन राजेश दाणी, सुरेश दिडमिशे व सहकाऱ्यांनी केले आहे.
0
3
2
1
2
3