विंचूरच्या तरुणाचा अपघातात मृत्यू
विंचूर : लासलगाव चांदवड रस्त्यावरील दिघवद परिसरात नादुरुस्त ट्रक व मोटरसायकल अपघातात विंचूर येथील ऋषिकेश धोंडीराम ढवन हा तरुण ठार झाला. बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.
विंचूर येथील ऋषिकेश ढवन व त्याचा मित्र हे दोघे मोटारसायकलहुन विंचूरकडे येत असताना दिघवद परिसरात रस्त्यालगत उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रक व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलच्या मागे बसलेला ऋषिकेश याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ठार झाला. ऋषिकेश याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार असून विंचूर व परिसरात मनमिळावू स्वभावाने ओळखल्या जाणाऱ्या ऋषिकेशच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दिघवद परिसरात गेल्या आठ दिवसांपासून एक नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आला आहे. आठ दिवसात तीन ते चार अपघात या ट्रकमुळे झाले. रस्ता छोटा असून त्यात हा ट्रक रस्त्यालगत उभा असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वेळीच हा नादुरुस्त ट्रक मोकळ्या जागेत उभा केला असता तर ही घटना घडली नसती अशी भावना नागरिकांमध्ये आहे.