ब्रेकिंग
अवैध व्यवसायाविरुद्ध लासलगाव पोलिसांची कारवाई

0
5
1
9
5
6
सागर कोते यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव पोलिसांचा कारवाईचा धडाका; अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले ; देवगाव, खेडलेझुंगे परिसरात तीन ठिकाणी धाडी; अवैध दारू विक्री आणि मटका जुगारावर पोलिसांची कारवाई
शिरवाडे वाकद:- लासलगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी देवगाव फाटा आणि खेडलेझुंगे परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून अवैध दारू विक्री तसेच मटका जुगारावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
• देवगाव फाटा येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई
देवगाव फाटा परिसरातील प्रथमेश हॉटेलच्या मागील मोकळ्या जागेत अवैधरीत्या देशी दारू विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने पंचांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत करण संतोष ईमाले (वय २५, रा. देवगाव फाटा, वाकद शिवार, ता. निफाड) याच्याकडून प्रिन्स संत्रा कंपनीच्या सात आणि भिंगरी कंपनीच्या सात, अशा एकूण १४ देशी दारूच्या सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच एक विवो कंपनीचा मोबाईलही जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ६ हजार १२० रुपये आहे. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अन्वये कारवाई करण्यात आली
• खेडला पाट परिसरात दारूच्या बाटल्या जप्त
दुसऱ्या कारवाईत खेडलेझुंगे शिवारातील खेडला पाटाजवळ गोदावरी एक्स्प्रेस कालव्याच्या पुलाजवळ अवैध दारू विक्रीच्या उद्देशाने दारू बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुपारी सुमारे १ वाजून १० मिनिटांनी छापा टाकला. या कारवाईत ओमेश संजय गायकवाड (वय ३५, रा. रुई, हल्ली रा. खेडलेझुंगे शिवार, ता. निफाड) याच्याकडून प्रिन्स संत्रा देशी दारूच्या १८० मिलीच्या नऊ सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारूची किंमत ७२० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले असून, याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अन्वये कारवाई करण्यात आली.
• खेडलेझुंगे येथे मटका जुगारावर छापा
तिसऱ्या कारवाईत खेडलेझुंगे येथील फॉरेस्ट गट क्रमांक १८ मधील नंदी वस्ती परिसरात कल्याण नावाचा मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत दिलीप शंकर पवार (वय ६३) आणि केशव सिताराम सोमवंशी (वय ३७), दोघेही रा. खेडलेझुंगे, ता. निफाड, यांच्याकडून मटका जुगारासाठी वापरली जाणारी अंक – आकड्यांची डायरी, पेन, कार्बन, रोख १ हजार ९४० रुपये आणि एक विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ११ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये कारवाई करण्यात आली.
• पोलिसांच्या धडक कारवाईची चर्चा
पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप विठ्ठल शिंदे, औदुंबर नवनाथ मुरडणर, अरुण डोंगरे, कैलास घोलप, गणेश अशोक नागरे, सागर सूर्यभान आरोटे तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवायांमध्ये सहभाग घेतला. गुप्त माहितीच्या आधारे नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या कारवायांमुळे देवगाव फाटा आणि खेडलेझुंगे परिसरातील अवैध दारू विक्री व मटका जुगाराविरोधात पोलिसांनी ठोस पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे.
अवैध व्यवसायांवर अशाच प्रकारे सातत्याने कारवाई सुरू राहिल्यास या गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
0
5
1
9
5
6


