Breaking
आरोग्य व शिक्षण

निफाड तालुक्यात सिकलसेल मुक्तीसाठी विशेष अभियान;

आरोग्य कर्मचारी करणार घरोघरी तपासणी

0 4 2 9 5 7

निफाड:
राष्ट्रीय सिकलसेल अ‍ॅनिमिया निर्मूलन मिशन अंतर्गत निफाड तालुक्यात सिकलसेल आजाराच्या निर्मूलनासाठी विशेष तपासणी व जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयाचे डॉ. चारुदत्त शिंदे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार, उपजिल्हा रुग्णालय निफाड व तालुका आरोग्य विभागाच्या वतीने हे नियोजन करण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडणार आहे.
सिकलसेल आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये १५ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविली जाईल. या अंतर्गत आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक व सेविका गावागावात घरोघरी जाऊन नागरिकांची प्राथमिक तपासणी करतील. विशेषतः ० ते ४० वयोगटातील नागरिकांवर या मोहिमेत अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असून, संशयित रुग्णांची सविस्तर तपासणी केली जाईल.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांनी या अभियानाच्या विविध टप्प्यांची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात १५ ते २० जानेवारी दरम्यान सिकलसेल रुग्ण आणि तपासणी न झालेल्या व्यक्तींची यादी तयार केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात २१ ते २५ जानेवारी या काळात सिकलसेल टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या तसेच AS आणि SS प्रकारातील व्यक्तींची पुढील तपासणी होईल. त्यानंतर २७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या तिसऱ्या टप्प्यात रुग्णांची ‘इलेक्ट्रोफोरेसीस’ तपासणी करून आजाराचे अंतिम निदान निश्चित केले जाणार आहे.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ‘सिकलसेल कुंडली’ तयार करण्यात येणार आहे. विवाहित व गर्भधारणेपूर्व जोडप्यांचे समुपदेशन करून ही कुंडली तयार केली जाईल. सिकलसेल हा आनुवंशिक आजार असल्याने पुढील पिढी सुरक्षित राहावी, या उद्देशाने आरोग्य विभाग योग्य मार्गदर्शन करणार आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशीरे यांनी नागरिकांना या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सिकलसेल निर्मूलनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून, नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्य माहिती देऊन आपली तपासणी करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय निफाड आणि तालुका आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे