0
4
2
9
5
7
येवलेकरांना केवळ विकास हवा आहे हाच आजवरचा इतिहास आहे*
*जेवढे प्रेम तुम्ही मला दिले तेवढेच महायुतीच्या उमेदवारांना निश्चित द्याल*
*येवल्यात आम्ही कुणाच्याही जमिनी, बँका लुबाडल्या नाही किंवा पैसेही बुडवले नाहीत*
*थेट हॉस्पिटलमध्ये सलाईन घेत असताना मंत्री छगन भुजबळ यांचा येवलेकरांशी ऑनलाईन संवाद*
*मंत्री भुजबळ यांना येवल्याविषयी तळमळ असल्याची जनभावना*
*स्वच्छ सुंदर आणि प्रगतीशील येवला आपल्याला घडावयाचे आहे – माजी खासदार समीर भुजबळ*
*येवला, ३० नोव्हेंबर :-* ‘येवलेकरांना केवळ विकास हवा आहे, हाच आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे येवला नगरपालिका निवडणुकीत जेवढे प्रेम तुम्ही मला दिले तेवढेच महायुतीच्या उमेदवारांना निश्चित द्याल’, अशी ठाम खात्री राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. मुंबईत हॉस्पिटलमध्ये सलाईन घेत असतानाही मंत्री भुजबळ यांनी महायुतीच्या प्रचार सभेत येवलेकरांशी ऑनलाईन संवाद साधला. उपचार घेत असल्यानाही मंत्री भुजबळ यांना येवल्याविषयी तळमळ असल्याची जनभावना प्रचार सभेत दिसत होती. दरम्यान, ‘येवल्यात आम्ही कुणाच्याही जमिनी, बँका लुबाडल्या नाही किंवा पैसेही बुडवले नाहीत’, असा टोलाही त्यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, रिपाई आठवले गट मित्र पक्ष घटक पक्षातील येवला नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी व २६ नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज येवला शहरातील शनी पटांगणावर जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी दृकश्राव्य माध्यमातून येवलेकरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे स्टार प्रचारक माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार मारोतीराव पवार, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, भाजपचे लक्ष्मण सावजी, धनंजय कुलकर्णी, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, बंडू क्षीरसागर, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, संभाजी पवार, अरुण मामा थोरात, प्रमोद सस्कर, डॉ.शेफाली भुजबळ, बाळासाहेब कर्डक, साहेबराव मढवई, मोहन जावळे, राजेश भांडगे, मोहन शेलार, संजय पगारे, संजय बनकर, सुरज पटणी, आनंद शिंदे, दत्ता निकम, निसार शेख, राजश्री पहिलवान, अशोक संकलेचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजाभाऊ लोणारी यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार, महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व येवलेकर बहुसंख्येने उपस्थित होते.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, ‘माझी इच्छा असताना देखील मला या निवडणुकीत आपल्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेता आला नाही. नुकतीच माझी एक शस्त्रक्रिया झाल्याने मी आपणास प्रत्यक्ष भेटू शकत नाही. त्यामुळे आपल्यासोबत या माध्यमातून संवाद साधत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आपला येवला सतत दुष्काळाच्या छायेत होता. दोन दशकांपूर्वी २००४ साली मला आपण आपली सेवा करण्याची संधी दिली. तेव्हापासून आपण येवल्याचा कायापालट करू शकलो. येवल्यात झालेला बदल आपण पाहतच आहात. आजवर आपल्या सर्वांची भक्कम साथ असल्यामुळेच हे शक्य झाल्याचा पुनरूच्चार भुजबळ यांनी केला.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, ‘आजवर कोट्यावधी रुपयांची शेकडो विकासाची कामे मतदारसंघात केली. त्यामुळे येवलेकरांनी मला पाच वेळा सातत्याने निवडून दिले. आपण येवल्यात अनेक विकासकामे केली आहेत. मांजरपाडा सारखे अत्यंत कठीण काम आपण पूर्ण केले आहे. राज्यातील हा पथदर्शी असा पहिलाच प्रयत्न असून तो यशस्वी झाला आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता. आपण येसगाववरुन येवला शहरासाठी पाणी आणत आहोत. हे पाणी येऊ नये यासाठी काही मंडळीनी राजकारण केले, त्यात खोडा घातला. पण हा प्रश्न आपण सोडविला आहे. पुढील काही महिन्यातच शहराच्या सर्व भागात दररोज आणि शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या कामाला सुरुवात होईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, ‘येवल्यातील असंख्य कामे प्रगतीपथावर आहेत. पिंपळस ते येवला या रस्त्याचे ५६३ कोटी रुपयांच्या निधीतून चौपदरी काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. तसेच कोपरगाव येवला मनमाड चौपदरी कॉंक्रीटरोड सह येवला बायपास रस्ता आपण करीत आहोत. विस्थापित गाळेधारकांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने लातूर पॅटर्नच्या धर्तीवर आपण लवकरच सोडविणार आहोत. आगामी काळात आपण येवला शहरामध्ये जी विकासकामे करणार आहोत त्याचा वचननामा आपल्या पसंतीला उतरल्याचे मला कळाले आहे’, असे त्यांनी सांगितले.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘येवला नगरपालिका निवडणुकीत महायुतीने दिलेले उमेदवार हे तळागळात काम करणारे आहेत. नगराध्यक्षपदासाठी आपण एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. आपले उमेदवार राजाभाऊ लोणारी हे मितभाषी आणि सर्वसामान्यांमध्ये मिळून मिसळून राहणारे आहेत. राजाभाऊ लोणारी यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतांनी विजयी कराल. मी जरी येवल्यात नसलो तरी समीर आणि पंकज हे तुमच्या सेवेसाठी येवल्यात आहेत. जेवढे प्रेम तुम्ही मला दिले तेवढेच प्रेम हे आपल्या महायुतीच्या उमेदवारांना निश्चित द्याल’, अशी मला खात्री असल्याचे भुजबळ म्हणाले.
*फिर भी जी गया*
भुजबळ यांनी सर्वात शेवटी शेर म्हणून भाषणाची सांगता केली. तो असा,
“संघर्ष की रात जितनी अंधेरी होती है, सफलता का सुरज उतना ही तेज चमकता है|
सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया,तकलीफ लोगों को तब हुई, जब मैं फिर भी जी गया||”
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यामध्ये अनेक विकास कामे केली.शिवसृष्टी, मुक्तीभूमी, अहिल्याबाई होळकर घाट, महात्मा फुले नाट्यगृह, शादीखाना , भिमालय, उपजिल्हा रुग्णालय, अंगणगाव बोट क्लब, रोकडे हनुमान मंदिर परिसर विकास अशी असंख्य कामे केली आहे. आता येवल्या शहरातील भविष्याचा विचार करता येवला शहरासाठी येसगाव वरून नवीन पाणी पुरवठा योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढील २५ वर्षांचा विचार करून नियोजन केले आहे. या योजनेला विरोध करत विरोधकांनी करंजवन योजना पुढे केली ही न परवडणारी योजना मांडली आणि येसगाव योजनेला विरोध केला. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्याकडून ही योजना मंजूर करून घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
येवला शहरातील विस्तापित गाळे धारकांना न्याय मिळावा यासाठी लातूरच्या धर्तीवर विस्थापित व्यावसायीकांना न्याय दिला जाणार आहे. खरतर माजी मुख्यमंत्री येवल्यात येऊन गेले. त्यांच्या कडे नगरविकास खाते असल्याने हा प्रश्न त्यांनी अगोदरच मार्गी लावायला हवा होता असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, येवला शहरातील ट्राफिक कोंडी दूर करण्यासाठी कोपरगाव – येवला – मनमाड चौपदरी काँक्रीट रस्ता मी स्वतः गडकरी साहेबांकडे जावून मंजूर करून घेतला आहे.वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी बायपास रोड सुद्धा त्यात धरलेला आहे. या रस्त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे.डिसेंबर अखेरपर्यंत या रस्त्याचा DPR तयार होवून त्याची निविदा प्रक्रिया सुरु होईल. पूर्वेकडून कोर्टापासून कोटमगाव रोड ते रेल्वे स्टेशन या ७.५० मीटर काँक्रीट रस्त्यासाठी आपण निधी मंजूर करून घेतला आहे. या रिंग रोडचे काम पुढच्या महिन्यामध्ये सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. नववसाहतींसाठी सुद्धा भुयारी गटार टप्पा २ आपण आखलेली आहे. शहरातील ८०% रस्ते काँक्रीटचे झालेले आहे. भुयारी गटार पूर्ण झाल्यानंतर शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे होतील असे आपण नियोजन केलेले आहे. शहर स्वच्छतेचा आपले प्राधान्य आहे. आज प्रत्येक प्रभागात १ घंटागाडी आहे. प्रत्येक प्रभागात अजून एक घंटागाडी देवून शहरात कचरा दिसणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. येवल्यात बायोमायनिंग प्रकल्प कार्यान्वित केला असून या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया केली जात असून शहर यामुळे स्वच्छ होत आहे. येवल्यात आपण कम्युनिटी सेंटर, नमो उद्यान, संविधान भवन यासह अनेक कामे आपण करणार आहोत. ही कामे फक्त दाखवलेली स्वप्न नाहीत तर आम्ही जी सुरु केली आहे आणि करणार आहोत अशीच कामे असल्याचे आवर्जून सांगितले.
ते म्हणाले की, जी आज आपल्यावर टीका करत आहे. त्यांनी येवल्यातील अनेक बँका आणि पतसंस्था संपविल्या.येवला मर्चंट बँकेला अडचणीत आणल. हे लोक जिथे गेले ती संस्था डूबवतात. जिल्हा बँकेमध्ये गेले जिल्हा बँक बुडाली. २० वर्षांपूर्वी साखर कारखान्याच्या नावाने शेअर्स जमा केले. त्यातून जमीनी घेतल्या, शाळा काढल्या. ज्यांनी पैसे परत मागीतले त्यांना दमदाटी केली अशी टीका त्यांनी केली. या निवडणुकीत काही प्रभागात गुंडगिरी आणि दमदाटी करण्याचा प्रकार जाईल. त्यांना सांगायचे आहे की,माझ्या कार्यकर्त्यांवर कुणीही दमदाटी करण्याचा प्रयत्न जरी केला. तरी याद राखा गाठ माझ्याशी आहे असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.
यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, गेल्या वीस वर्षांपूर्वी येवला हा दुष्काळी आणि विकासापासून वंचित असलेला मतदारसंघ होता. येवलेकरांनी मंत्री छगन भुजबळ यांना येवल्यात आणले. त्यानंतर गेल्या वीस वर्षात आज येवल्यात अनेक महत्वाची विकास कामे झाल्याने येवल्याचे रूप बदलले आहे. येवला आज भुजबळ साहेबांचा परिवार आहे. त्यांची उणीव भासू नये म्हणू सर्व कुटुंबाला आपल्याकडे पाठविले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार मारोतीराव पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका म्हणून येवल्याची ओळख आहे. राजे रघुजी बाबा यांनी शहराची स्थापना केली. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली येवल्यात मुक्तीभूमीसह अनेक विकासाची कामे त्यांनी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज येवला नगरपालिका निवडणुकीला आपण सामोरे जात असून आपला विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपचे लक्ष्मण सावजी म्हणाले की, आजची सभा ही महायुतीच्या विजयाची सभा आहे. आजच्या सभेच्या गर्दी बघून हे नक्कीच आहे. आज भाजप राष्ट्रवादीचे नेते एका स्टेजवर बघून अनेकांच्या पोटात देखील दुखत असेल अशी टीका त्यांनी केली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चतुर्सुत्री मांडली आहे. महाराष्ट्रात मंत्री छगन भुजबळ हे देखील एक विकासपुरुष नेतृत्व असून येवल्याच्या विकासाचे शिल्पकार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्या विचारांतून युती होऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे सर्व महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, बाळासाहेब कर्डक, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, विधानसभा अध्यक्ष वंसत पवार, प्रमोद सस्कर, प्रा.नागेश गवळी, राजेश भांडगे, अशोक संकलेचा, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र लोणारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर दराडे यांनी केले.
0
4
2
9
5
7


