भरघोस परतावा देणार्या सतीश काळे सरांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल
50 लाख 86 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हरी ओम कंपनीचे संस्थापक सतीश पोपटराव काळे व योगेश परशुराम काळे यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमनाथ गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान कंपनी चालक सतीश काळे बेपत्ता असल्याचे समजते.
कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेले लासलगाव येथे एका कॉम्प्लेक्स मध्ये आलिशान ऑफिस थाटून गुंतवणूकदारांना अव्वाच्या सव्वा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सुमारे सात वर्षांपूर्वी सतीश काळे सर यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटकही करण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांनी काही दिवस तुरुंगवास भोगल्याचे समजते. मात्र अलीकडेच काही दिवसांपूर्वी सतीश काळे उर्फ काळे सर यांनी काही महिन्यांपूर्वी पुन्हा आपला व्यवसाय सुरू करून गुंतवणूकदारांकडून मोठ मोठ्या रकमा घेऊन त्यांना अत्यंत अल्पावधीतच दाम दुपटीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले.
गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून भरघोस मोबदला मिळण्याची वाट बघितली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सतीश काळे सर अचानक बेपत्ता झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याबाबत पोलिसांनाही विचारणा केली असता आमच्याकडे याबाबत कुठलीही तक्रार नसल्याचे सांगण्यात येते. मात्र सोशल मीडियावर काळे सर बेपत्ता झाल्याची चर्चा होत असून डिजिटल पोर्टलवर बातम्या ही प्रसिद्ध झालेल्या आहेत. दरम्यान सुरुवातीच्या काळात सतीश काळे सर यांनी छोटी मोठी गुंतवणूक स्वीकारून योग्य मोबदला देत गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. जशी जशी गुंतवणूक वाढत गेली तस तसं त्यांचा हा गुंतवणुकीचा व्यवसायही हायटेक होत गेला. त्यांनी अनेक ठिकाणी पतसंस्था स्थापन करून या संस्थेत कर्मचारी भरण्यासाठी चांगल्या रकमाही स्वीकारलेल्या होत्या. याच त्यांच्या पतसंस्थांमध्ये इतर बँकांच्या मानाने अधिक परतावा देण्याचे कबूल केलेले होते. हे सर्व सुरळीत चालू असतानाच दरम्यान त्यांनी स्वस्तात प्लॉट विक्री ही सुरू केलेली होती. मात्र यातही काही जणांची फसवणूक झालेली होती. त्यानुसार पोलिसात तक्रार दाखल झाल्याने सतीश काळे यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल होऊन त्यांना अटकही झाली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सतीश काळे अचानक लासलगाव मध्ये अवतरले व त्यांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला चांगलाच जोमाने सुरू झालेला व्यवसाय पाहता दूरवरून गुंतवणूकदारांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक केल्याचे सांगण्यात येते.
अशा प्रकारच्या मोठ्या रकमा स्वीकारून सतीश काळे सर बेपत्ता झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. नेमके काय प्रकरण आहे. हे पोलीस दप्तरी नोंद झाल्यावरच उघडकीस येईल.