जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांची नियुक्ती
नाशिक, दिनांक 12 ऑगस्ट, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :
लेफ्टनंट कर्नल विलास शंकर सोनवणे (नि) यांची जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नाशिक या पदावर नियुक्ती झाली असून त्यांनी पदभार स्विकारला आहे.
जिल्ह्यातील सेवारत सैनिक, वीर पत्नी, वीर माता-पिता, माजी सैनिक आणि त्यांचे अवलंबित यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कार्यालय सदैव तत्पर राहीन. विशेषत: वीर पत्नी, वीर माता-पिता आणि त्यांचे अवलंबितांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांचा प्रचार व प्रसिद्धी प्रभावीपणे करण्यात येवून या योजनांचा लाभ प्रदान करणेसंदर्भात विशेष मोहिम राबविण्यात येईल. याकामी समाज माध्यमांचाही उपयोग करून घेतला जाणार असल्याचे लेफ्टनंट कर्नल विलास शंकर सोनवणे यांनी पदभार स्विकारतांना सांगितले.
पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाशी संबंधित सैनिकांच्या अडचणी सोडविण्याठी तालुका समन्वय समितीचे आयोजन करण्यात येईल. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सेवारत सैनिक आणि माजी सैनिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास शंकर सोनवणे (नि) यांनी केले आहे.
0000000
‘हर घर तिरंगा’ उपक्रम –
गंगापूर धरण सांडव्यावर तिरंगा लेझर शो, रोषणाई
नाशिक, दिनांक 12 ऑगस्ट, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
याच अनुषंगाने जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यातील गंगापूर धरणावर तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात येणार असून धरणाच्या सांडव्यावर तिरंगा लेझर शो ची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सायंकाळी 6.30 ते रात्री 9.30 या वेळेत या तिरंगा लेझर शो व रोषणाईचा आनंद घ्यावा, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000