
0
2
5
5
5
9
संतांच्या शब्दांचा आणि वाणीचा प्रसाद ॲड. विद्याताई बाकरे यांनी लिहिलेल्या श्री नामदेव गाथा एक स्वाध्याय या पुस्तकातून अनुभवयाला येतो – बबनराव काकडे
नाशिक : ” संतांनी आपल्या तेजस्वी जीवन यज्ञातून संपूर्ण समाजासाठी आचार, विचार, चारित्र्य आणि नीतिमत्तेची आधारशीला निर्माण केली अशा त्यांच्या शब्दांचा आणि वाणीचा प्रसाद ॲड. विद्याताई बाकरे यांनी लिहिलेल्या ‘ श्री नामदेव गाथा एक स्वाध्याय ‘ या पुस्तकातून अनुभवयाला येतो, ” असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्री बबनराव काकडे यांनी केले.
ते ‘ श्री नामदेव गाथा एक स्वाध्याय ‘ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संत साहित्याचे अभ्यासक व नामवंत वक्ते श्री नंदन राहणे उपस्थित होते त्याचबरोबर सन्माननीय अतिथी म्हणून एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. संध्या खेडेकर उपस्थित होत्या.
यावेळी श्री. काकडे पुढे म्हणाले की, कोणताही प्रसंग कोणताही सिद्धांत संत वचनांचे प्रमाण देऊनच ॲड. विद्याताईंनी आपल्या पुस्तकात मांडलेला दिसतो आणि प्रत्येक गोष्ट सप्रमाण दिल्यामुळे यातील प्रत्येक प्रसंगाला आणि सिद्धांताला सत्यत्व आणि विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री नंदन राहणे म्हणाले की, संत परंपरा आणि त्यांचा आत्ताच्या काळाशी असलेला संदर्भ व संबंध आजच्या तरुण पिढीने घ्यायचा बोध सुंदर पद्धतीने या पुस्तकात मांडलेला आहे. संतांचे सहज बोलणे, त्यांचे हितोपदेश कायमच आदर्श आहेत. त्याचबरोबर संतानी समाजातील चुकीच्या रूढीवर प्रथम ज्ञानाचा कडकडीत आसूडदेखील ओढलेला आहे. आज-काल स्वार्थ साधून घेणारी मंडळी या संतांच्या मूळ उपदेशाकडे सर्रास दुर्लक्ष करतात आणि संत वचनांचा आपल्याला हवा तसा अर्थ लावून मोकळे होतात.
तर कार्यक्रमाच्या सन्माननीय अतिथी प्राचार्या डॉ. सौ संध्या खेडेकर म्हणाल्या की संत म्हणजे चालत्या बोलत्या कल्पतरूंचे उद्यान हेच सौ. विद्याताई बाकरे यांनी हळुवारपणे एकेका टप्प्याचे दर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून घडविले आहे. तसेच आज समाजामध्ये महिला सक्षमीकरण या गोष्टीकडे पाहत असताना बदलते चेहरे आणि बदलती माणसं यांचा विचार करता आपण आपल्या चेहऱ्याचा किंवा मानसिकतेचा रिमोट कंट्रोल समोरच्या व्यक्तीकडे कधीच देता कामा नये. तरच आपण एक सक्षम महिला म्हणून एक माणूस म्हणून समाजात वावरताना आपल्या मानसिकतेला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही.
यावेळी गणपती वंदन व नामदेव महिमा पुरुषोत्तम बाकरे यांनी सादर केला तर ईशस्तवन व संत नामदेवाचे अभंग श्री. संजय परमसागर यांनी सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय डॉ. के आर शिंपी यांनी करून दिले. मान्यवरांच्या हस्ते श्री. नामदेव गाथा एक स्वाध्याय या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी पुस्तकाचे प्रकाशक ॲड. धनराज बाकरे यांनी पुस्तकाचा परिचय करून दिला. याप्रसंगी यशस्वी व कर्तबगार महिलांचे सत्कार प्राचार्य डॉ. संध्या खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन ॲड. धनराज बाकरे, डॉ. के. आर. शिंपी, सौ. जयश्री शिंपी, सौ. विद्या वैद्य, कु. पार्थ शिंपी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन डॉ. उत्तम करमाळकर यांनी केले कार्यक्रमाची सांगता श्री नंदांचे राहणे यांनी संत नामदेवांचे पसायदान गाऊन केली.
विशेष सत्कारार्थी महिलांची यादी खालील प्रमाणे :
१. श्रीमती प्रतिभाताई प्रकाश निकते (गाथाव्रती, पंढरपूर)
२. सौ. मीनाक्षी सूर्यकांत धटिंगण (गाथाव्रती, नाशिक)
३. श्रीमती वृषाली संजीव तूप साखरे (अध्यक्षा, नाशिक महानगर नामदेव शिंपी सांस्कृतिक मंडळ)
४. सौ भारती केशव शिंपी (अध्यक्षा, सिडको परिसर, नामदेव शिंपी महिला मंडळ, नाशिक)
५. डॉ. अनुष्का सुनील ढोमणे (फिजिओथेरपिस्ट, नाशिक.)
६. डॉ. अलया लक्ष्मी साहेबराव वाघ (फिजिओथेरपिस्ट, नाशिक.)
७. डॉ. मीना गिरडकर (मराठी विषयात पीएच.डी. प्राप्त)
८. डॉ. कविता पाटील (बीए.एम.एस. एम.डी. पीएच.डी.)
अशा विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
0
2
5
5
5
9