कनिष्ठ महाविद्यालयीन युवकांनी व्यसनांपासून परावृत्त व्हावे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे
नाशिकरोड :– ” आज जे गुन्हेगार सापडतात त्यात युवा तरुण वयोगट १५ ते २२ असा दिसून येतो. हे युवक जेव्हा अमली पदार्थाच्या आहारी जातात. त्याची नशा शमवण्यासाठी चोऱ्या,दरोडे, लूटमार, वाहन चोरी, सुसाट वाहन पळवणे अशा गुन्ह्यांमध्ये सापडतात. याला वेळीच अटकाव व्हावा नाहीतर त्याचे,त्याच्या कुटुंबाचे व समाजाचे जीवन उद्ध्वस्त होते.आपल्याला मिळालेले आयुष्य सन्मानाने जगा. संकटावर मात करण्यासाठी आपले आत्मबल वाढवा. चांगला अभ्यास करून आपले उज्वल करिअर घडवा. सकारात्मक विचार करा. पालकांनाही त्याबाबत समस्या सतावत आहे. शासनाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली आहे. कुठलाही अमली पदार्थ शरीरासाठी घातक आहे. तुम्ही विद्यार्थी कुटुंबाचा व समाजाचा आधार आहात. कुठल्याही व्यसनांना बळी न पडता आमले पदार्थांचे सेवन करू नका, ” असे मार्गदर्शन करताना उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालय विभागातर्फे सेमिनार हॉलमध्ये दि. २६ जून रोजी झालेल्या ” जागतिक अमली पदार्थ विरोधी दिना’निमित्त जनजागृती प्रबोधनपर आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जितेंद्र सपकाळे यांच्यासह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सातभाई, एपीआय रूपाली गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात २६ जून रोजी ‘ जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन’ विधायक उपक्रमांच्या स्वरूपात साजरा केला जातो. मोबाईल व अमली पदार्थ व्यसनाच्या आहारी जाऊ नका असे सांगितले.
यावेळी वपोनि जितेंद्र सपकाळे यांनी उपस्थित कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपण अंमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवन आयुष्य जगू अशी प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास माळवे यांनी केले तर आभार सौ. भावना जगताप यांनी मानले. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.