वन अधिकाऱ्यांवर कारवाईच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे

दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी वन मजूर राजेंद्र साळुंखे यांनी ताराबाद येथील वन विभागाच्या कार्यालयाबाहेर स्वतःला पेटवून घेत आत्मदहन केले होते. त्यानंतर त्यांच्यावर नाशिक येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर जोपर्यंत राजेंद्र साळुंखे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत जायखेडा पोलीस स्टेशन समोर नातेवाईक व नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत मयत राजेंद्र साळुंखे यांच्या वारसांना सहा महिन्यात वन सेवेत सामावून घेतले जाईल तसेच राजेंद्र साळुंके यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन आंदोलकांना देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे या आंदोलनाची दखल घेऊन व्हिडिओ कॉल द्वारे आंदोलकांशी संपर्क साधला. तसेच या प्रकरणी राज्यव्यापी आंदोलन उभारले जाईल असे सांगितले.