मुंबईला बोट उलटल्याने 13 जणांचा मृत्यू
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखाची मदत, ‘निलकमल’ बोट चालकावर होणार कारवाई?
मुंबई -: मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जात असलेली ‘निलकमल’ ही बोट पाण्यात उलटल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सायंकाळी घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. मृत 13 जणांपैकी 3 जण नौदलाचे असल्याची माहितीही त्यांनी दिली असून या दुर्घटनेबाबत संपुर्ण माहिती उद्या मिळेल असेही ते म्हणाले असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार असल्याचे श्री फडणवीस यांनी सांगीतले.
नीलकमल ही बोट बुधवारी गेट ऑफ इंडियाजवळ समुद्रात बुडाली. या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नौदलाकडून त्याचा इन्कार करण्यात आला. दरम्यान नीलकमल बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. बोटीची क्षमता 80 असताना त्यातून 110 जण प्रवास करत होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक करणार्या बोट मालकावर गुन्हा दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अपघातात 101 लोकांना वाचवण्यात आले आहे. संध्याकाळी 7.30 पर्यंतची ही माहिती आहे. अद्याप पूर्ण माहिती मिळाली नाही. या घटनेची नौदल आणि मुंबई पोलीस चौकशी करणार आहे.
मुंबईतील गेट ऑफ इंडियावरुन नीलकमल ही बोट एलिफंटाकडे बुधवारी संध्याकाळी निघाली होती. या बोटीची क्षमत 80 प्रवाश्यांची आहे. परंतु त्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी होते. एकूण 110 प्रवाशी बोटीत असल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी बोट मालकावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली. बोटीवर तब्बल 110 जण होते अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून (बीएमसी) अधिकृतपणे देण्यात आली. विविध रुग्णालयामध्ये दाखल असलेले प्रवाशी 110 होते. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी बोटीत असल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, नीलकमल बोटीला धडकणार्या नौदलाच्या स्पीड बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय नौदलाकडून व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात अधिकृत माहिती नौदलाकडून देण्यात येणार आहे. गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा बोटीला झालेल्या अपघातातील जखमींना उपचारासाठी नवी मुंबईतील जेएनपीए रुण्यालयात दाखल केले आहे. त्यातील एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.