गुन्हा दाखल झालेल्या भोंदू विरोधात जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावा….
इंदिरानगर पोलीस स्टेशन तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी निफाड यांचेकडे निवेदनाद्वारे अंनिसची मागणी.
गणेश जयराम जगताप उर्फ बडे बाबा पाथर्डीवाला ह्या भोंदूंने तंत्रमंत्र, तंत्र विद्या करून जमिनीतून सोन्याचा हंडा काढून देतो, गंभीर आजार बरे करतो, दैवी तोडगे करून व्यसन सोडवतो अशा प्रकारच्या अंधश्रद्धेतून थापा मारून, भीती दाखवून नाशिक मधील एका महिलेचे तब्बल पंधरा वर्षे लैंगिक शोषण केले. तंत्र विधी करून नवऱ्याची दारू सोडवितो, तसेच माझे जर ऐकले नाही तर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होईल, अशा प्रकारची भीती दाखवून ह्या महिलेची पन्नास लाख रुपयांची फसवणूकही केली.
याबद्दल इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी या भोंदूविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र या गुन्ह्यांमध्ये जादूटोणाविरोधी कलम लावलेले नाही. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक व निफाड शाखेच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर पोलीस स्टेशन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की या भोंदूला डिसेंबर २०२० मध्ये सुद्धा अटक झालेली होती. त्यावेळीही अंनिसतर्फे कडक कायदेशीर कारवाई करण्याकामी पोलिसांना विनंती केलेली होती.
मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतरही या भोंदूने मागील पाच वर्षांत धारणगाव (खडक) येथे २५ ते ३० कोटी रुपये खर्च करून कामाख्या देवीचे मंदिर उभारण्याचे काम सुरू केल्याचे समजते . लोकांना अध्यात्माच्या नावाने किंवा अंधश्रद्धेच्या माध्यमातून उपाय, उपचार करणे ,तसेच विविध प्रकारची दैवी शक्ती , चमत्कार वा तत्सम भीती दाखवून त्याने लोकांकडून मोठमोठ्या रकमा उकळल्या असण्याची दाट शक्यता आहे.
म्हणून पोलिसांनी सध्या फरार असलेल्या ह्या भोंदूबाबाचा कसून शोध घ्यावा . त्याला व त्याच्या साथीदारांनाही लवकरात लवकर ताब्यात घ्यावे. तो पुन्हा निसटणार नाही, याची संपूर्ण काळजी घ्यावी.
यापूर्वी ह्या टोळीने अंधश्रद्धेच्या माध्यमातून अनेकांना फसवून त्यांचे विविध प्रकारे शोषण केले असण्याची दाट शक्यता आहे , असे अंनिसचे मत आहे . त्याने यापूर्वी लोकांच्या अगतिकतेचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन,कुठे कुठे,काय ,काय काळे धंदे केलेले आहेत, तेही समाजासमोर आणावेत. जेणेकरून समाज भोंदूबाबांच्या मागे लागणार नाही.
धारणगाव (खडक )येथील कामाख्या देवी मंदिरात व आसपास अंधश्रद्धांच्या आधारे लोकांच्या विविध गंभीर समस्या वर उपाय, उपचार करावयाच्या सर्व आक्षेपार्ह वस्तू, गैरप्रकार केल्याचे पुरावे जमा करावेत. जेणेकरून या भोंदूला आणि त्याच्या सर्व साथीदारांना जादूटोणाविरोधी कायदा तसेच इतर आवश्यक
कायद्यानुसार कडक कायदेशीर
कारवाई करणे शक्य होईल.
त्यामुळे बडेबाबा उर्फ पाथर्डी वाला यांच्यासह इतर सर्व सहभागी साथीदारांना जबर शिक्षा होईल . परिणामी परिसरातील भोंदूगिरीला मोठ्या प्रमाणात आळा बसू शकेल.
निवेदनावर महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे ,जिल्हा बुवाबाजी विरोधी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे, निफाड तालुका अध्यक्ष डॉ. उत्तमराव डेर्ले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



