किरण घायदार, नाशिक :
शिर्डी येथून नाशिकला जाणारी ई बस (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) महामार्ग स्थानकात शनिवार (दि. ७) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फलाटावर चौकशी कक्षासमोर थांबली होती. चालकाने बस सुरू करताच बस थेट चौकशी कक्षावर धडकली. अपघातात आंध्रप्रदेशची महिला बसखाली सापडून जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडली. अंजली थट्टीकोंडा – नागार्जुन (२३, रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.
शिर्डी ते नाशिक मार्गावर धावणारी ई बस सुरक्षितपणे मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्थानकात पोहचली. चालक उमेश दत्तात्रय भाबड (३२, रा. वेहळगाव, नांदगाव) यांनी बस फलाटावर थांबविली. बसमधून प्रवाशी खाली उतरल्यानंतर ते लॉक सीट एंट्री करण्यासाठी बसखाली उतरले. काम आटोपून भाबड पुन्हा बसमध्ये चढले. त्यांनी बस सुरू करताच जोरदार आवाज झाला अन् काही क्षणातच बसने अचानक उसळी घेतली. काही सेकंदाच लोखंडी बार तोडून बस थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर धडकली. याच दरम्यान चौकशी कक्षाजवळच्या ओट्यावरून पती मुपाल्ला नागर्जुन (३०, रा. कोंडीकंडर, जि. प्रकाशम) यांच्यासोबत चालत असलेल्या अंजली नागर्जुन यांना बसची जोरदार धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
चौकशी खिडकीसमोर बसची माहिती घेण्यास उभे असलेले गोरक्ष मछिद्र गोसावी (५७, रा. पाथर्डीफाटा) हे धडकेत जखमी झाले आहे . या घटनेत चौकशी कक्षाची एका बाजूची भिंत पूर्णतः कोसळली आहे. हा प्रकार पाहताच स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोसावी यांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांनी चालक भाबड यांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
अमरावती ते यवतमाळ रोडवरील धानोरा गुरव ते नांदगाव खंडेश्वरच्या रस्त्याच्या मध्ये अमरावती 1 आगाराची शिवशाही बस झाडाला धडकली… सदर अपघात स्टेअरिंग न कटल्यामुळे झाला… पण चालकाच्या समय सूचकतेमुळे सर्व प्रवासी सुखरून असून यामध्ये महिला वाहकाला दुखापत झाली आहे