Breaking
क्रिडा व मनोरंजनसामाजिक

रहस्य आणि थरार यांच्या संगमातून उलगडणारा ‘असंभव’!

0 4 2 9 5 7

मराठी चित्रपटसृष्टीत रहस्य आणि थराराचा नवा अध्याय लिहिणारा ‘असंभव’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. सचित पाटील दिग्दर्शित या चित्रपटाचा थरारक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझरनंतर निर्माण झालेलं कुतूहल या ट्रेलरने आणखीनच वाढवलं आहे.

ट्रेलरच्या पहिल्याच फ्रेमपासून प्रेक्षक एका गूढ आणि विलक्षण जगात प्रवेश करतात. नैनितालच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये, शुभ्र धुक्याच्या सान्निध्यात आणि गूढ हवेलीच्या वातावरणात घडणारी ही कथा भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या संगमातून आकार घेत असल्याचे दिसतेय. हवेलीतील अघटित घटना, शांततेत दडलेली भीती आणि प्रत्येक पात्राच्या मनात दडलेलं रहस्य हे सगळं ट्रेलरच्या दृश्यरचनेतून काहीतरी असामान्य घडणार असल्याची जाणीव देते.

मुक्ता बर्वेच्या नजरेतील भीती आणि प्रश्न, प्रिया बापटचे गूढ वर्तन, सचित पाटीलचा उत्तरांच्या शोधात असलेला प्रवास आणि संदीप कुलकर्णी यांचा या सगळ्याशी असलेला संबंध हे सर्वच प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारे असून प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय आणि ते उलगडताना संपूर्ण चित्र बदलतंय, असा एक विलक्षण अनुभव हा ट्रेलर देतो.

दिग्दर्शक सचित पाटील म्हणतात, “या ट्रेलरमधून प्रेक्षकांना ‘असंभव’ची अनोखी झलक पाहायला मिळते. पुनर्जन्म ही संकल्पना मराठी चित्रपटात क्वचितच साकारण्यात आली आहे. रहस्य, थरार, भावना आणि वास्तव यांचा मिलाफ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल. प्रत्येक पात्राचं जग उलगडताना, प्रेक्षक त्यांच्या भावनांशी एकरूप होतील.’’

निर्माते नितीन वैद्य म्हणतात, ‘’ ‘असंभव’ हा एक रहस्यपट आहेच, सोबतच तो भावनांचा आणि नात्यांचाही अनुभव आहे. हा चित्रपट तयार करताना आम्ही केवळ कथा सांगायचा प्रयत्न केला नाही, तर प्रत्येक क्षण अनुभवता यावा यावर लक्ष केंद्रित केलं आणि म्हणूनच यातील रहस्य, भावना आणि नात्यांचा गुंता या चित्रपटाला वेगळेपणा देतो.”

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी केलं असून पुष्कर श्रोत्री यांनी सह-दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. मराठीतील चार गुणी कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र पडद्यावर झळकणार आहेत. मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर व संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत.

रहस्य, भावना आणि नात्यांच्या गुंफलेल्या कथेतून उलगडणारा हा थरारक सिनेमा २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 9 5 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे