डियाजियो इंडिया आणि नाशिक महानगरपालिकेने सामंजस्य करार केला
2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नदी संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन उपक्रमांना बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल
नाशिक: डियाजियो इंडिया (युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड) आणि नाशिक महानगरपालिका (एनएमसी) यांनी 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी आणि नांदिनी नद्यांचे आरोग्य जपण्यासाठी तसेच नदी संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन उपक्रमांना चालना देण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. हा करार नाशिक महानगरपालिका कार्यालयात झाला असून, यावेळी आयएएस स्मिता मनिषा खत्री (कमिशनर आणि अॅडमिनिस्ट्रेटर, नाशिक महानगरपालिका), आयएएस करिश्मा नायर (अतिरिक्त कमिशनर, नाशिक महानगरपालिका), अभय दाभोलकर (सिनियर जनरल मॅनेजर – मॅन्युफॅक्चरिंग, डियाजियो इंडिया) तसेच सीएसआरबॉक्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या कराराअंतर्गत डियाजियो इंडिया तर्फे तपोवन परिसरातील गोदावरी आणि नांदिनी नदीवरील दोन महत्त्वाच्या ठिकाणी ‘बूम बॅरिअर’ बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. या उपक्रमामुळे नदीत येणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल आणि ही नदी स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वाची पायरी ठरेल. हे प्रयत्न सिंहस्थ कुंभाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेला कुंभमेळ्याच्या तयारीत मदत करतील. कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक नाशिकला येतात, ज्यामुळे शहराच्या नागरी आणि पर्यावरणीय व्यवस्थेवर मोठा ताण येतो.
डियाजियो इंडियाचे कॉर्पोरेट रिलेशन्स डायरेक्टर देवाशीष दासगुप्ता म्हणाले, “नाशिक महानगरपालिकेसोबतची ही भागीदारी आमच्या स्पिरिट ऑफ प्रोग्रेस या ईएसजी कृती योजनेशी आणि ‘प्रिजर्व वॉटर फॉर लाइफ’ या आमच्या संकल्पाशी घट्टपणे जोडलेली आहे. आम्ही सह-स्थापक असलेल्या द गोदावरी इनिशिएटिव्ह या उपक्रमाद्वारे नदी खोऱ्याचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि पर्यावरणीय संतुलन मजबूत करण्यासाठी काम करत आहोत. ‘बूम बॅरिअर’ बसविणे हा या प्रयत्नातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत नाशिक महानगरपालिकेला सहकार्य करण्यासाठी आम्ही उत्साहित आहे.”
सौ. मनिषा खत्री, आयएएस, कमिशनर आणि अॅडमिनिस्ट्रेटर, नाशिक महानगरपालिका म्हणाल्या, “येणाऱ्या सिंहस्थ कुंभपूर्वी गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या द गोदावरी इनिशिएटिव्ह उपक्रमाअंतर्गत “द फ्लोटिंग बॅरिअर्स प्रोजेक्ट मध्ये डियाजियो इंडियाचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. ही भागीदारी स्वच्छ आणि निरोगी नदी परिसंस्थेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही डियाजियो इंडियासोबत पुढेही सहकार्य करण्यास उत्सुक आहोत आणि आपल्या नद्यांचे संरक्षण व पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करतो.”
ही भागीदारी डियाजियो इंडियाच्या स्पिरिट ऑफ प्रोग्रेस या ईएसजी कृती योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामध्ये ‘प्रिजर्व वॉटर फॉर लाइफ’ या उद्दिष्टावर भर देत जलसंवर्धन, हवामान बदलाशी जुळवून घेणे आणि समाजाच्या कल्याणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या वचनबद्धतेचा भाग म्हणून डियाजियो इंडिया देशभरातील विविध राज्यांमध्ये जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि निरंतर पाणी उपलब्धता यासाठी सातत्याने गुंतवणूक करत आहे..
या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे द गोदावरी इनिशिएटिव्ह (टीजीआय) — हा एक अनोखा संयुक्त उपक्रम आहे, जो गोदावरी नदी खोऱ्याच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या आव्हानांवर काम करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. डियाजियो इंडिया हा या उपक्रमाचा संस्थापक भागीदार असून, या उपक्रमाला प्रमुख कॉर्पोरेट संस्था, अलायन्स फॉर वॉटर स्टुअर्डशिप, सीएसआरबॉक्स आणि इतर संस्थांचे सहकार्य मिळाले आहे. टीजीआयचे उद्दिष्ट समुदायाच्या कल्याणासोबत पर्यावरणीय संतुलन आणि दीर्घकालीन जलसुरक्षा राखणारी सक्षम आणि समृद्ध नदी परिसंस्था निर्माण करणे आहे. गोदावरी नदी खोऱ्याचा सुमारे 55350 चौ.किमी क्षेत्र व्यापणाऱ्या या उपक्रमाचा लाभ महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांतील सुमारे 2.3 कोटी लोकांना होणार आहे.



