रांगोळीतून साकारल्या मनमोहक नवदुर्गा….!
नाशिक /किरण घायदार
नवरात्र महोत्सवात दुर्गा देवीची नानाविध रूपातील पूजा बांधली जाते. देवीची ही रूपे मन प्रसन्न करून जातात. अशी देवीची नऊ वेगवेगळीआकर्षित व मनमोहक रूपे रांगोळीतून साकारली आहेत माधुरी पैठणकर यांनी…..
रांगोळी आर्टिस्ट माधुरी पैठणकर यांनी त्यांच्या बंगल्यांच्या अंगणात त्यांनी या रांगोळ्या काढल्या आहेत. रांगोळीतून साकारलेली देवी दुर्गेची ही विविध रूपे नजर खिळवून ठेवतात. सिंह, वाघ, अशा वेगवेगळ्या वाहनांवर आरूढ झालेली, विविध आयुधांनी नटलेली ही शक्तीरूपा अगदी बारकाईने साकारण्यात आली आहे.
रांगोळी काढणे ही आपली महाराष्ट्रीय पद्धत आहे. ती टिकवून ठेवावी, या उद्देशाने पैठणकर यांनी देवीची विविध रूपे साकारली आहेत.
देवीची नऊ रूपे असतात हे अनेकांना माहीत असले, तरी ती नेमकी कोणती, त्यामागची कथा काय, याची माहिती नसते. ही सर्व माहिती लोकांना व्हावी, यासाठी त्यांचा प्रयत्न आहे.
नवरात्रीच्या 15 दिवस त्यांनी रांगोळी काढण्यास सुरुवात केली. दररोज एक देवीचे रूप साकारायचे असा त्यांचा विचार होता; पण लोकांना सर्व रूपे नवरात्र पूर्ण होण्याआधी पाहायला मिळणे शक्य व्हावे, यासाठी त्यांनी 10 ते 12 दिवसांत सर्व रूपे पूर्ण करण्याचे ठरवले. प्रत्येक रांगोळी पूर्ण करण्यासाठी त्यांना किमान चार ते 8 तास लागले.
वारा, धूळ, कचरा यामुळे रांगोळ्या खराब होऊ नयेत याची काळजी घेणे खूप कठीण आहे. दररोज या रांगोळ्यांमध्ये काही खराब झाले असेल, तर त्याची दुरुस्ती करावी लागते, असेही पैठनकर यांनी सांगितले.
‘या रांगोळ्या बघून आजूबाजूच्या परिसरातील लोक आवर्जून येऊन भेट देत आहेत. परदेशी मुलींनादेखील या रांगोळ्यांनी भुरळ घातली. लोक कौतुक करत आहेत, लोकांचा हा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे,’ अशी भावना पैठनकर यांनी शेवटी व्यक्त केली.