ब्रेकिंग
अखेर हायवा डम्पर वर कारवाई साठी पोलीस प्रशासन सज्ज

0
4
6
2
0
8
हायवा डंपर प्रकरणी लासलगाव पोलिसांची तात्काळ दखल; अपघातांच्या मालिकेनंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये ; नियम तोडल्यास थेट कारवाई
किरणकुमार आवारे…
शिरवाडे वाकद :- निफाड पूर्व भागात हायवा डंपरच्या बेफाम वेगामुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची लासलगाव पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी तातडीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये वाढत असलेली भीती आणि संताप लक्षात घेता लासलगाव पोलिसांनी संबंधित यंत्रणांना सूचना देत प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नाशिक ते छत्रपती संभाजीनगर महामार्गासह परिसरातील रस्त्यांच्या कामांमुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. या अवजड वाहनांमुळे अपघात होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांची आणि संबंधित यंत्रणेची विशेष बैठक घेतली आहे. या बैठकीत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी योग्य प्रकारचे सुरक्षा फलक लावणे, रिफ्लेक्टर्स बसवणे आणि रात्रीच्या वेळी वाहनधारकांना दुरूनच कामाची कल्पना येईल अशा उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अवजड वाहनांचे चालक आणि मालक यांनाही बोलावून सुरक्षिततेबाबत सक्त ताकीद देण्यात येणार आहे. आम्ही पोलीस प्रशासन म्हणून सर्वतोपरी उपाययोजना करत आहोत, मात्र नागरिक आणि वाहनधारकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. वाहन चालवताना वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये आणि नियमांचे पालन करूनच प्रवास करावा, आपण सर्वजण सुरक्षित घरी पोहोचाल याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, यापुढे रस्त्यावर किंवा परिसरात वाहतूक नियमांच्या विरोधात काही बाबी निदर्शनास आल्यास किंवा निष्काळजीपणा दिसून आल्यास पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक पाटील यांनी दिला आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त होत असून, पुढील काळात अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
• निफाड पूर्व भागातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. रस्ते कामांच्या ठिकाणी सुरक्षा नियम सक्तीने लागू केले असून, अवजड वाहन चालकांनी वेगमर्यादा व नियमांचे काटेकोर पालन करावे. उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांची सुरक्षा आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
– दिपक पाटील
सहाय्यक पोलीस निरीक्षक
0
4
6
2
0
8



