Breaking
शासकीय

मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले

लाभार्थी महिलांनी आपल्या भावना मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर व्यक्त केल्या.

0 3 2 1 2 3

मुंबई, दि. 15: ‘मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत. या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.

कालपासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.. अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही ती कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

‍मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्या पुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. यामुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असेलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने 108 योजना सुरु केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

नाशिक जिल्ह्यातील लाभार्थींशीही संवाद
दरम्यान या संवाद सत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रातिनिधिक लाभार्थींशीही संवाद साधला. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांच्यासह दोन्ही योजनांच्या लाभार्थी उपस्थित होत्या.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती खैरनार, ज्योती महाजन तसेच मुख्यमंत्री युवा कार्य योजनेच्या लाभार्थी तेजस्विनी कुलथे यांनी आपल्या भावना मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती सुनील खैरनार (रा. नांदगाव, ता. नांदगाव) यांनी १७ जुलै रोजी योजनेचा अर्ज स्वत: भरला होता. महिनाभराच्या आतच त्यांच्या बँक खात्यावर काल दुपारी रुपये तीन हजार रक्कम झाल्याचे जमा सांगून आपल्याला ही रक्षाबंधनची ओवाळणी मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या घरी पती, सासू, सासरे व २ छोटी अपत्ये आहेत. त्यांचे पती कापड दुकानात काम करतात. सहा जणांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांच्या पगारात भागविताना तारेवरची कसरत व्हायची. कुटुंबाला हातभार म्हणून त्या स्वत: अस्मिता ग्राम संघाच्या सदस्या झाल्या असून, बाजरी प्री मिक्स करण्याचे काम त्या करतात. या पैशांतून संसारासाठी आर्थिक मदत होणार असल्याचे सांगून त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. 
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्योती अरुण महाजन (रा. गिरणानगर, ता. नांदगाव) यांनी बँक खात्यावर ३ दिवसांपूर्वी रक्कम जमा झाल्याचे सांगून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. कुटुंबात त्यांच्यासह पती, सासू व दहावी पास मुलगा हे सदस्य आहेत. त्यांचे पती खासगी वाहनचालक आहेत. त्या स्वतः उम्मेद अभियानच्या सी आर पी आहेत. त्यांनी १५ जुलै रोजी स्वत: या योजनेचा अर्ज भरला होता. स्वतः अर्ज भरण्याबरोबरच त्यांनी इतर महिलांनाही प्रेरित केले. त्यांचा मुलगा आय. टी. आय. ला प्रवेश घेत असून त्याच्या प्रवेशासाठी या रकमेचा विनियोग करणार असल्याचे त्या म्हणाल्या. 
या दोन्ही लाभार्थींनी मुख्यमंत्रीरूपी भाऊ आपल्या पाठिशी असल्याबद्दल आनंद व्यक्त करून राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.
तेजस्विनी नंदकुमार कुलथे (रा. नाशिक) ही पदवीधर युवती नोकरीच्या शोधात असताना अनुभवाअभावी तिचे प्रयत्न अपुरे पडत होते. मात्र, तिला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती मिळाली. तिने नोंदणी केल्यानंतर तिला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी तिला मासिक दहा हजार रूपये विद्यावेतन मिळणार आहे. यामुळे तिला आर्थिक मदतीसह शासकीय कार्यालयातील कामकाजाचा अनुभव मिळणार असून, भविष्यातील नोकरीसाठी या अनुभवाची मदत होणार असल्याचे सांगून तिने राज्य शासनाचे आभार मानले. 
00000
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

लोकशास्र

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 2 1 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे