प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024-25
शेतकरी बांधवांना 15 जुलैपर्यंत सहभागाची संधी
नाशिक (जि. मा. का. वृत्तसेवा) :
शासनाने 1 रूपयात प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम 2024-25 साठी लागू केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करून 15 जुलै 2024 पर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पीक विमा योजनेत भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी सुद्धा सहभाग नोंदवू शकतात. त्याकरिता नोंदणीकृत भाडे करार पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. आपले सरकार सुविधा केंद्र (CSC) धारकास पीक विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रूपये 40/- प्रमाणे रक्कम अदा करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरीक्त शुल्क भरावे लागत नाही.
भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मुग, उडीद, तूर, मका, भुईमुग, कारळे, तीळ, सुर्यफुल, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा इत्यादी अधिसूचित पिके मंडळ व तालुका स्तरावर पीक विमा भरण्यास पात्र आहे. पीक विमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्र चालकांनी (CSC) व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांच्या नावात आधारकार्ड, सात बारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांवर किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरुन घ्यावा. त्याचप्रमाणे विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांचे नावामधील दुरस्ती करुन घेणेबाबत त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच जर शेतकऱ्याच्या नावात पूर्णतः बदल असेल तर अशा शेतकऱ्यांचा विमा भरुन घेऊ नये. कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधारकार्डशी जे बँक खाते लिंक आहे अशा खात्यावरच नुकसान भरपाई जमा होणार आहे. त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील, आधार कार्डवरील व सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
000000